मुंबई (Pclive7.com):- महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतली. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस… असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी पद व गोपनियतेची शपथ घेत स्वत:च्या नावावर वेगळा विक्रम रचला. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री, दिग्गज भाजपा नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती, आमदार, खासदार आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी देवेंद्र फडणवीस यांना शपथ दिली. फडणवीस यांच्यासह शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा हा महासोहळा संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनानंतर राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत गाऊन शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली.