बनावट आधार कार्ड, ८० हजारात जागा घेतली
जुलै महिन्यात चार रोहिंग्या हे म्यानमारमधून बांगलादेशात आणि बांगलादेशातून थेट देहूरोड परिसरातील गांधीनगर येथे आले होते. हे चारही लोक पंडित चाळीत बेकायदेशीर पद्धतीने राहत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या चौघांवर कारवाई केली. मात्र याच्यातील एक असलेल्या मुजल्लीम खान यांने देहूरोड येथे ८० हजार रुपयांना जागा विकत घेतली आणि त्या जागेवर घर बांधून संसार देखील थाटला.
बनावट कागदपत्र वापरून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकत घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. मुजलीम खान याने चंद्रभागा कांबळे यांच्याकडून ८० हजार रुपयांना ६०० चौरस फूट जागा खरेदी केली आणि त्या ठिकाणी घर बांधले.
म्यानमारमध्ये मौलानाचा कोर्स केला
मुजल्लीम खान याने म्यानमार येथील इस्लामिक संस्थेत मौलाना कोर्स पूर्ण केला आहे. तो आणि त्याची पत्नी दोन मुलांसह म्यानमार येथे राहत होता. त्यानंतर २०२२ मध्ये तो कुटुंबासह बांगलादेशात राहायला गेला. मात्र बांगलादेशात त्याला काम मिळाले नाही. त्यामुळे तो भारतात आला.
कोलकत्तामध्ये राहत असताना तिथे काम न मिळाल्याने मुजल्लीम खान थेट पुण्याला आला. पुण्यात तो बेकायदेशीर पद्धतीनं राहत होता. देहूरोड परिसरात कपडे विकण्याचा व्यवसाय करत होता. भिवंडीतून कपडे आणून पुण्यातील देहूरोड परिसरात विकायचा.