पिंपरी (Pclive7.com):- गेल्या काही वर्षांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डिजिटलायझेशनमध्ये लक्षणीय प्रगती केली असून यामागील उद्देश सार्वजनिक सेवेचे वितरण आणि पारदर्शकता वाढवणे हा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रमुख सेवांचे डिजिटलायझेशन करून नागरिकांना अधिक सुलभ आणि जलद गतीने सेवा देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
केंद्रीय नागरी सेवेतील सनदी अधिकारी प्रशिक्षणार्थींनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्प आणि उपक्रमांना भेट दिली. या अधिकाऱ्यांशी आयुक्त शेखर सिंह यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे कार्यकारी व्यवस्थापक ओमप्रकाश देशमुख, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, मनोहर जावरानी, लक्ष्मीकांत कोल्हे, दिव्यांग भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, संचालक अभिजीत मुरुगकर, वास्तुविशारद प्रसन्न देसाई, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) समन्वयक अनंत पोरे आदी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थींमध्ये अलोक कुमार, अनन्या किर्ती, अमनदिप, अर्घ्य पटनाईक, अमित जैन, निखिल खरे, एम.व्ही सत्यसाई कार्तिक, राघव तनेजा, अंकित कुमार संखवत, राहुल कुमार, अरूण पवित्रण, हार्दिक अग्रवाल, अरविंद मीना, नेहा विरावल्ली, बलवीर सिंग, अलोक राजन राय, धीरज कुनूबिल्ली, भूर सिंग मीना, गरीमा, राकेश बानोथ, महेश गीते, हरी शंकर, मिनाक्षी दास, हर्षा प्रियंवदा, वदिथ्य नाईक, जगदीश अदाहल्ली, महेश जुवन्नापुडी, कंभान सॅम्युलप्रविणगौथम, अरविंद कुमार, अभिजीत कुमार, धीरज कुमार, संजीव कुमार, शरन्या पोलुमती या भारतीय पोलीस सेवा, भारतीय रेल्वे वाहतूक सेवा, भारतीय महसूल सेवा, भारतीय माहिती सेवा, भारतीय टपाल सेवा, भारतीय लेखापरिक्षण व लेखा सेवा, भारतीय नागरी लेखा सेवा, भारतीय कॉर्पोरेट कायदा सेवा, भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांचा समावेश होता.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, महापालिकेचा ऑनलाइन कर भरणा, ऑनलाइन विवाह नोंदणी, जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र सुविधा, समाजविकास विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा, लॉगिन आयडीचा वापर करून नागरिकांच्या सोयीसाठी तक्रार निवारण यंत्रणा, महापालिका कार्यालये तसेच स्मार्ट टॉयलेट शोधण्यासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर, आपत्कालीन वेळेत संपर्क साधण्यासाठी मदत कार्य, स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी पुढाकार, वेबिनारचे आयोजन, महापालिकेच्या आरोग्य अभियानांची माहिती आदी सुविधांचा ई-गव्हर्नन्स प्लॅटफॉर्ममध्ये समावेश केल्याने नागरिक कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट प्रशासानाशी संवाद साधू शकतात. या डिजिटल साधनांमुळे केवळ कार्यक्षमतेत वाढ झाली नसून सर्वसमावेशकतेमध्येही सुधारणा झाली आहे. डिजिटलायझेशनच्या दिशेने चालू असलेला हा प्रवास शाश्वत शहरी विकासासाठी असलेली महापालिकेची वचनबद्धता दर्शवितो, असे ते म्हणाले. जमिनीवरील भूक्षेत्राचे मोजमाप तसेच जमीनीखालील विविध वाहिन्यांची माहिती जीआयएस प्रणालीद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या उपक्रमाला देखील महापालिकेने सुरूवात केली आहे. त्यामुळे शहराचे भविष्यातील नियोजन करताना या सर्व तंत्रज्ञानयुक्त उपक्रम आणि प्रकल्पांचा महापालिका प्रशासनाला उपयोग होतो. सद्यस्थितीत शहरात वाहतुक कोंडीची समस्या उद्भवत असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी समन्वय साधून महापालिकेने आराखडा तयार करण्यास सुरूवात केली आहे. इंडिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) च्या माध्यमातून शहरातील विविध भागांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त सिंह यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे वेस्ट टू एनर्जी, इंडिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर, हरित सेतू, वेस्ट टू बायोगॅस तसेच दिव्यांग भवन हे नाविन्यपुर्ण उपक्रम इतर महापालिकांसाठी पथदर्शी उपक्रम ठरत आहेत. उपस्थित सनदी अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारे त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक सोयी सुविधा सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच एकूणच शाश्वत विकास साधण्यासाठी कार्य करावे, अशा शब्दांत आयुक्त शेखर सिंह यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, औंध ते वाकड फाट्यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा केलेले सुशोभिकरण, पिंपळे सौदागर येथील लिनीअर गार्डन, मोरवाडी येथील दिव्यांग भवन, निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी) आदी विकासकामे आणि प्रकल्पांना प्रशिक्षणार्थींनी भेट दिली. या सर्व प्रकल्पांची माहिती प्रत्यक्षस्थळी आणि संगणकीय सादरीकरणाद्वारे संबंधित विभागप्रमुखांनी दिली.