पिंपरी (Pclive7.com):- दिव्यांगांसाठी उभारण्यात येणाऱ्या दिव्यांग भवनाचा आणि साहित्य साधनांचा दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण प्रगतीसाठी वापर करावा असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि रांजणगाव येथील फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रायवेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक शाळेत सीएसआर सक्षम उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कुत्रिम अवयव व साहित्य वाटप आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सस्टेनेबिलिटी अँन्ड गव्हर्मेंट रिलेशन्स तथा सीएसआर प्रमुख राकेश बावेजा, समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांच्यासह कर्णबधीर, पूर्णतः अंध, मतीमंद, अस्थिव्यंग, मेंदूचा पक्षाघात या प्रवर्गातील २६४ दिव्यांग विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
आज झालेल्या शिबिरात २६४ विद्यार्थ्यांना ५७७ साहित्य साधनांचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्हील चेअर, ब्रेल कीट, श्रवनयंत्र, टीएलएम कीट, रोलेटर, सीपी चेअर, वॉकर, प्रोग्रामेबल स्मार्ट फोन, स्मार्ट केन कॅलिपर या साहित्य साधनांचा समावेश होता. ऑगस्ट महिन्यात झालेल्या साहित्य वाटप मोजमाप शिबिरात एकूण ३४७ दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी २६४ विद्यार्थ्यांना साहित्य साधनांची शिफारस करण्यात आलेली होती.
आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड महापालिका ही दिव्यांगांच्या सोयीसुविधांसाठी सतत कार्यरत असणारी महापालिका असून दिव्यांगांसाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना राबविण्यात येतात असे सांगून उपस्थित शिक्षकांना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.
दरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, वकृत्व तसेच अंध विद्यार्थ्यांनी समूहगीत सादर केले.
यासोबतच विषयतज्ञ राजेंद्र पोकळे, कविता ढोरे, तृप्ती धुमाळ तसेच विशेष शिक्षक संदीप भुजबळ, सचिन अवचिते, रेणुका बिडवई, मंगल गायकवाड, शैला भुजबळ, सोनम साळुंखे, सुजाता गायकवाड, रत्नमाला लोखंडे, जयश्री वाढे, रुपाली देशमुख, माधुरी देशमुख, शोभा माशेमनाळ यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता बांगर यांनी, सूत्रसंचालन जालिंदर राऊत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार फियाट कंपनीचे विभागीय व्यवस्थापक प्रदीप पाटील यांनी मानले.