पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी आग्रही भूमिका घेतली. सभागृहाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या भागातील बांगलादेशी रोहिंग्यांच्या मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन महापालिका आयुक्त तसेच पोलिस आयुक्तांना त्याबाबत आदेश द्यावेत, तसेच कुदळवाडी, चिखली भागातील कारवाईनंतर होणाऱ्या उद्रेकाबाबतही सतर्क रहावे, असेदेखील म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध भागांमध्ये काही दिवसांपूर्वी २३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. बनावट ओळखीच्या आधारे पासपोर्ट काढून देणारे मोठे रॅकेट काही एजंट चालवतात. पिंपरी-चिंचवड, पुणेसह मोठ्या शहरांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे रॅकेट सक्रिय आहे, हे स्पष्ट होते. म्हणूनच आता पिंपरी-चिंचवड पोलिस व महापालिका प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे. चिखली कुदळवाडी या परिसरामध्ये तातडीने कोंबिंग ऑपरेशन होऊन येथील समाजविघातक कृत्य घडवून आणू शकणाऱ्या व्यक्ती, प्रवृत्तींना वेळीच गजाआड करणे गरजेचे आहे. अशी कारवाई झाल्यानंतर मोठा उद्रेक होण्याची देखील भीती आहे. या दृष्टीने सतर्कतेने पावले उचलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
कुदळवाडी-चिखली भागातील भंगार गोदामे शहरातील नदी, हवा आणि येथील रहिवासी यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. वारंवार येथे आग लागण्याच्या घटना घडतात. मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान होते. पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या घटनांच्या आडून देशविघात प्रवृत्ती समोर येण्याची भीती आहे. भंगार दुकानांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या कामगार आहेत. मात्र, त्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे वेळीच बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री महोदय यांनी दिले आहे.
– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.