वाकड (Pclive7.com):- मोबइल चोरीला गेला की तो गेला तर परत मिळणार नाही… असा एक समज निर्माण झाला आहे. त्याला तडा देत वाकड पोलिसांनी २० लाख रुपये किंमतीचे मोबाईल शोधून १२० नागरिकांना परत केले आहेत. वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ अथवा चोरी झालेले १२० मोबाइल फोन राज्यातून अथवा परराज्यातून परत मिळविलेले फोन संबंधित नागरिकांना परत केल्यामुळे त्यांचे चेहरे आनंदाने खुलले.
वाकड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२१) नागरिकांना मुद्देमाल परत देण्यात आला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून मोबाइल फोन चोरी, हरवणे तसेच गहाळ होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष मोहीम राबवून अशा फोनचा शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वाकड विभागाचे सहायक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मागदर्शनाखाली वाकडचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी अंमलदार शहाजी धायगुडे, कोंतैय खराडे, प्रमोद गायके यांचे विशेष पथक स्थापन केले. सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर (सीईआयआर) या पोर्टलव्दारे चोरीला गेलेले, हरवलेले किंवा गहाळ झालेले मोबाइल फोन या विशेष पथकाने ट्रेस केले.
परराज्यातून मोबाइल परत आणले..
हरवलेले, गहाळ व चोरी झालेले मोबाइल हे पिंपरी-चिंचवडसह राज्यातील वेगवेगळे जिल्हे तसेच बिहार, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंधप्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश येथे ट्रेस झाले. संबंधित मोबाइल ज्या व्यक्तींच्या ताब्यात आहेत त्यांच्याशी संपर्क साधून मोबाइल परत करण्याबाबत सांगितले. प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून मोबाइल परत मागविले. काही मोबाइल पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन हस्तगत केले.
मागील दोन महिन्यांमध्ये वाकड पोलीस ठाण्याकडून २० लाख रुपये किमतीचे १२० मोबाइल हस्तगत करण्यात आले. यापुढेही अशीच मोहीम राबवून नागरिकांचे गहाळ, चोरी झालेले मोबाइल परत करण्याची कार्यवाही चालू राहील.– विशाल गायकवाड, पोलीस उपायुक्त
सदरची कामगिरी विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड डॉ. शशीकांत महानवर, पोलीस सह आयुक्त वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, विशाल गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि-२, सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाणेकडील निवृत्ती कोल्हटकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार शहाजी धायगुडे, पोलीस शिपाई कौंतेय खराडे व प्रमोद गायके यांनी केली आहे.