जेजुरी (Pclive7.com):- आंबेगाव तालुक्यातून सोमवती यात्रेनिमित्त जेजुरीला येणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला समोरुन येणाऱ्या टेम्पोने घडक दिल्याची घटना सासवड रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री घडली. अपघातात टेम्पोतील दोन भाविकांचा मृत्यू झाला, तसेच १३ जण जखमी झाले. जखमींवर जेजूरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अपघातात टेम्पो चालक जितेंद्र ज्ञानोबा तोत्रे (वय ३५, रा. कुरवंडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), आशाबाई बाळकृष्ण जरे (वय ५०, रा. जरेवाडी, ता. खेड) यांचा मृत्यू झाला. अपघातात १३ भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील कुरवंडी गाव परिसरातून १५ भाविक टेम्पोतून सोमवती यात्रेनिमित्त रविवारी रात्री जेजुरीला निघाले होते.
सासवड-नीरा रस्त्यावर बेलसर गावाजवळ मध्यरात्री अडीचच्या सुमारास समोरुन येणाऱ्या भरधाव टेम्पोने टेम्पोला धडक दिली. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थ, तसेच जेजुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेम्पोला धडक देऊन अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करत आहेत.