तळेगाव (Pclive7.com):- उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीला गुरुवारी (दि.६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आग लागली.

दरम्यान, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागल्यानंतर काही वेळात आगीने मोठे स्वरूप धारण केले, त्यामुळे इमारतीतून आग आणि धुराचे लोट बाहेर निघत होते.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल, तळेगाव एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. सर्वांनी सामूहिक प्रयत्न करीत पंधरा मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी व पथकही उपस्थित होते. आगीत इमारतीतील वस्तूंचे बरेच नुकसान झाले असून नव्या इमारतीच्या अग्निरोधक क्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे.