पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील महिलांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळावे यासाठी पात्र महिला व मुलींना मोफत एचपीव्ही (HPV) लस उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य श्रुती वाकडकर यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत महापालिकेने विशेष लसीकरण योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमधील गंभीर व जीवघेण्या आजारांपैकी एक असून एचपीव्ही विषाणू हे त्यामागील प्रमुख कारण मानले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एचपीव्ही लसीकरणामुळे या आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.

सध्या शालेय स्तरावर मुलींसाठी एचपीव्ही लसीकरणाबाबत विविध उपक्रम राबविले जात असले, तरी विवाहिता, नवमाता तसेच प्रजनन वयोगटातील महिलांपर्यंत या प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचा पुरेसा विस्तार झालेला नाही. त्यामुळे महापालिकेच्या सर्व प्रसूतीगृहे, रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांचे समुपदेशन करून त्यांना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत मार्गदर्शन करण्यात यावे, तसेच वैद्यकीय निकषांनुसार पात्र महिलांसाठी विशेष एचपीव्ही लसीकरण अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच महानगरपालिकेच्या सर्व शासकीय रुग्णालये, प्रसूतीगृहे व नागरी आरोग्य केंद्रांमध्ये पात्र महिला व मुलींना मोफत एचपीव्ही लस उपलब्ध करून देणे, व्यापक जनजागृती मोहीम राबविणे, नियमित तपासणी व स्क्रीनिंग कार्यक्रम आयोजित करणे आणि महिलांच्या आरोग्याबाबत विशेष समुपदेशन करणे, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे. महिलांचे आरोग्य सुदृढ राहणे ही समाजाच्या सर्वांगीण विकासाची मूलभूत गरज असून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासारख्या गंभीर आजाराच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मोफत एचपीव्ही लसीकरण योजना तातडीने सुरू करावी, अशी अपेक्षा श्रुती वाकडकर यांनी व्यक्त केली आहे.


















Join Our Whatsapp Group