पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी दर आठवड्याला “सिव्हिक सेन्स” (नागरिक शिस्त व सामाजिक जबाबदारी) या विषयावर विशेष सक्तीचा तास सुरू करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका स्नेहा रणजित कलाटे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

देशभरात राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती मोहिमांमुळे नागरिकांमध्ये स्वच्छता आणि सामाजिक जबाबदारीबाबत जागरूकता वाढत असली, तरी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, रस्त्यावर थुंकणे आणि ध्वनीप्रदूषण करणे यांसारख्या समस्या अद्यापही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच नागरिक शिस्त आणि सामाजिक मूल्यांची जाणीव निर्माण करणे आवश्यक असल्याचे कलाटे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’ विषयावर नियमित तास घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक स्वच्छता, वाहतूक नियमांचे पालन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक शिस्त आणि सार्वजनिक संपत्तीचे जतन याबाबत सकारात्मक दृष्टिकोन विकसित होईल. तसेच जबाबदार नागरिकत्वाची भावना रुजण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
“आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत. त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली तर भविष्यात अधिक शिस्तबद्ध, सजग आणि सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होईल,” असेही त्यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाला आवश्यक त्या सूचना देऊन सर्व शाळांमध्ये ‘सिव्हिक सेन्स’ विषयाचा विशेष तास सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी नगरसेविका स्नेहा कलाटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.






















Join Our Whatsapp Group