पिंपरी (Pclive7.com):- चिखली – कुदळवाडीत पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहिली असून, महापालिका प्रशासनाने त्यात लक्ष घालून परिस्थिती सुधारावी आणि नागरिकांच्या उद्रेकाचा अंत बघू नये असा इशारा माजी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी दिले असून, पिंपरी चिंचवड महापालिका कार्यालयावर महिला आणि नागरिकांचा मोर्चा नेण्याची परिस्थिती आणू नका असे म्हटले आहे.

गेले पंधरा दिवस कुदळवाडीत पिण्याच्या पाण्याला जनता तहानलेली आहे. वारंवार महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना विनंती करूनही त्यात सुधारणा होत नाही. त्याविरोधात प्रभाग कार्यालयावर हंडा मोर्चा नेण्यात आला होता. त्यानंतर अधिकाऱ्यांना दिनेश यादव यांनी भेटून परिस्थिती तातडीने सुधारा अन्यथा पालिका मुख्यालयावर मोर्चा घेऊन धडक मारू असा इशारा दिनेश यादव यांनी दिला आहे. आधीच महापालिका प्रशासनाविरोधात कुदळवाडीतील महिलांच्या मनात मोठा रोष असून, त्याला निमित्त मिळून काही वावगे घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असे यादव यांनी म्हटले आहे. यावेळी प्रभाग कार्यालयाचे अधिकारी श्रीकांत कोळप, प्रीतम बाविस्कर, रमेश जिंतीकर, कोकाटे आदी उपस्थित होते.