पिंपरी (Pclive7.com):- केंद्र शासनाच्या राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी सामाजिक सहाय्य योजना २०२२-२३ अंतर्गत राज्य शासनाच्या मालकीची १५ वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान असणारी वाहने टप्प्याटप्प्याने निकामी करण्याच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीच्या ९७ वाहनांचा लिलाव करण्यात आला. या लिलावाद्वारे महापालिकेस ५९ लाख २५ हजार रुपये महसूल प्राप्त झाला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्या एमएसटीसी (धातू भंगार व्यापार महामंडळ), मुंबई या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने हा लिलाव पार पडला. या लिलावामध्ये कार, टाटा सुमो तसेच इतर अवजड वाहनांचा समावेश होता. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी ९७ वाहनांची तपासणी करून त्यांची लघुत्तम किंमत ४९ लाख ४५ हजार रुपये निश्चित केली होती. मात्र लिलाव प्रक्रियेद्वारे महापालिकेस तब्बल ५९ लाख २५ हजार रुपये महसूल प्राप्त झाला, जो निश्चित लघुत्तम रकमेपेक्षा ९ लाख ८० हजार रुपये (१९.८२ टक्के) अधिक आहे.
या लिलावात ९७ वाहनांची पाच गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. या सर्व गटांची विक्री यशस्वीरित्या पार पडली. प्राप्त रकमेमधून २५ टक्के रक्कम एमएसटीसी यांच्याकडे जमा केल्यानंतर विक्री आदेश निर्गमित केला जाणार असून उर्वरित ७५ टक्के रक्कम महापालिकेकडे जमा झाल्यानंतर संबंधित बोलीदारांना वाहनांचे वितरण करण्यात येणार आहे.
“महापालिकेच्या वाहन लिलाव प्रक्रियेमुळे केवळ जुन्या वाहनांचा योग्य पुनर्वापर झाला नाही, तर महापालिकेस अपेक्षेपेक्षा जास्त महसूल प्राप्त झाला आहे. ही प्रक्रिया भविष्यातही नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येईल, जेणेकरून महानगरपालिकेच्या मालमत्तेचा योग्य विनियोग होईल आणि नागरी सुविधांसाठी अधिकचा निधी उभारला जाईल.
– चंद्रकांत इंदलकर, अतिरिक्त आयुक्त (३), पिंपरी चिंचवड महानगरपालिका