पिंपरी (Pclive7.com):- बुलढाणा जिल्ह्यातील एक दाम्पत्य काही दिवसांपूर्वी आपल्या आठ वर्षांच्या मुलासह रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. दरम्यान, गावातील एका ओळखीच्या व्यक्तीने सोमवारी (दि.३१) सायंकाळी पाच वाजता त्यांच्या मुलाचे अपहरण केले. या घटनेनंतर खंडणी विरोधी पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यांनी भुसावळ पोलिस ठाणे, रेल्वे सुरक्षा बल, सरकारी रेल्वे पोलिस आणि भुसावळ रेल्वे स्थानक यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. या संयुक्त कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली आणि मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.

गजानन सुपडा पानपाटील (२५, रा. पुनई, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आठ वर्षीय मुलाच्या आईने मंगळवारी (दि.१) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील एक दाम्पत्य काही दिवसांपूर्वी आपल्या आठ वर्षीय मुलासह पिंपरी चिंचवड शहरात कामासाठी आले होते. आरोपी गजानन हा अपहृत मुलाच्या वडिलांच्या भावाचा मित्र आहे. आरोपी गजानन हा देखील शहरात कामाच्या शोधात आला होता. मात्र, त्याला काम मिळाले नाही. हे पती-पत्नी दोघे कामाला जात होते. त्यांचा आठ वर्षीय मुलगा हा घरीच राहत होता. त्यावेळी आरोपी त्याच्याशी जवळीक साधत असे. मुलाला काही खाद्य पदार्थ खायला देत होता. एकदा त्याने मुलाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाच्या आईने मुलाला त्याच्या तावडीतून सोडविले.

दरम्यान, ३१ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आरोपीने मुलाचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच खंडणी विरोधी पथकाने तपासाला सुरुवात केली. पथकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आरोपीचा फोटो आणि मोबाईल नंबर प्राप्त केला. तांत्रिक विश्लेषण केला असता आरोपी अपहृत मुलाला रेल्वेने घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, भुसावळ पोलिस स्टेशन, रेल्वे सुरक्षा बल, सरकारी रेल्वे पोलिस, भुसावळ रेल्वे स्टेशन, मुक्ताईनगर, जळगाव, चाळीसगाव पोलिस स्टेशन यांच्याशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेजवरून रेल्वे पोलिसांनी आरोपीची शहानिशा करत काशी एक्सप्रेसमध्ये बसलेल्या आरोपीला ताब्यात घेत अपहृत बालकाची सुटका केली. खंडणी विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सुनील बदाने, पोलिस अंमलदार प्रदीप पोटे, ज्ञानेश्वर कुराडे यांनी चाळीसगाव पोलिस ठाणे येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
सदरची कामगिरी युनिट-०२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनिल कानगुडे, पोलीस अंमलदार प्रदिप पोटे, ज्ञानेश्वर कुन्हाडे, प्रदिप गोंडाबे तसेच सहायक पोलीस उपनिरीक्षक नागेश माळी, रेल्वे सुरक्षा बल तसेच जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या पथकाने केली आहे.






















Join Our Whatsapp Group