पिंपरी (Pclive7.com):- “सिद्ध योगी गुरुवर्य सद्गुरु माऊली महाराज वाळुंजकर उर्फ जय बाबा यांनी आपले आयुष्य लोक कल्याणासाठी अर्पण केले.” असे गौरवोद्गार पंढरपूर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.

सिध्दयोगी गुरुवर्य सद्गुरुनाथ श्री माऊली महाराज वाळुंजकर यांचा १०० वा अभिष्टचिंतन सोहळा नव महाराष्ट्र विद्यालय, मैदान, पिंपरी गाव येथे त्यांचे सर्व भक्त आणि शिष्य परिवार यांनी दि.१ एप्रिल २०२५ रोजी साजरा केला. या कार्यक्रमासाठी पंढरपूर रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले.
यावेळी “चंदनाचे हात,पाय ही चंदन, परिसा नाही हीन कोणी अंग” हा संत तुकाराम महाराज यांच्या अभंग किर्तन रुपी सेवेसाठी निवडला. ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी कीर्तन रुपी सेवेत परमपूज्य सद्गुरु माऊली महाराज वाळुंजकर यांनी आपले आयुष्य लोक कल्याणासाठी अर्पण केले असे गौरवोद्गार काढले. जो दुसऱ्याला मोठे करतो देव त्याला मोठे करतो, जीवन क्षणभंगुर आहे. लाख माणसातून एका माणसाला देव भेटतो तसेच करोडो माणसातून एका माणसाला शंभर वर्षे आयुष्य देव देतो. आकल्प आयुष्य होण्यासाठी अध्यात्मिक क्षेत्रातून गुरु करून भव सागरातून मुक्त व्हावे असे प्रतिपादन केले. या काळात जय बाबा शिष्य मंडळींनी रक्तदान शिबिर घेऊन १५० लोकांनी रक्तदान केले. वृक्षारोपण केले. तसेच बाबांची शोभनीय नेत्र दीपक मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. तसेच जवळ जवळ पाच दिवसाच्या कार्यक्रमात ५०००० च्या वर लोकांना अन्नप्रसादाचा लाभ देण्यात आला.

यावेळी आमदार महेशदादा लांडगे, माजी आमदार विलास लांडे, बापूसाहेब पठारे, आमदार अमित गोरखे, सुनील टिंगरे, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, उप महापौर प्रभाकर वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, दत्तात्रय वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, कामगार नेते अरुण बोराडे, जय बाबा परिवाराच्या वतीने संदेश गोलांडे यांनी मनोगत व्यक्त केले. संदीप वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गुरुवर्य बाबांचे भव्य मंदिर व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि पूर्णत्वास नेण्यासाठी मी प्रयत्न करेल असे मनोगत व्यक्त केले. युवा नेते ऋषिकेश वाघेरे पाटील यांनी जय बाबा परिवाराला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. गुरुवर्य बाबांना परमहंस भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली. पिंपरी गाव ग्रामस्थ जय बाबा भक्तगण आणि शिष्य परिवार यांच्यातर्फे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी जय बाबा भक्तगण आणि परिवार तसेच पिंपरी ग्रामस्थ उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय तरटे, अतुल बनकर, अभिजीत वाघेरे यांनी केले.