पिंपरी (Pclive7.com):- भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार यादी घोटाळा झाल्याने कायद्याला अपेक्षित मोकळ्या व प्रामाणिक वातावरणात निवडणूक प्रक्रिया झाली नाही, असा आरोप करणाऱ्या निवडणूक याचिकेची दखल घेऊन न्यायमूर्ती आर. आय. छागला यांनी प्राथमिक सुनावणी झाल्यावर आमदार महेश लांडगे यांच्या विरुद्ध नोटीस जारी करून १५ एप्रिलपर्यंत याचिकेतील आरोपांबाबत उत्तर सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

भोसरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार म्हणून अजित दामोदर गव्हाणे यांनी भाजपच्या महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आपल्या बाजूने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण असताना अचानक महेश लांडगे मताधिक्क्याने निवडून आले. लांडगे यांच्या निवडणूक विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका गव्हाणे यांनी ॲड. असीम सरोदे, ॲड. श्रीया आवले, ॲड. राजाभाऊ चौधरी यांच्या मदतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.

६२ हजार बोगस मतदारांची नावे?
एकाच नावाच्या, वय, घराचा पत्ता सारखाच असलेल्या व्यक्तींना वेगवेगळे मतदान आयडी कार्ड देणे, सारखीच नावे, वय व सारखा मोबाईल नंबर असलेल्या अनेक लोकांना मतदार म्हणून नोंदवून घेणे अशी ६२००० बोगस मतदारांची नावे भोसरीतील मतदार यादीत समाविष्ट आहेत, अशी लेखी तक्रार मतदार यादी नक्की करण्याच्या आधीच दिली होती. पण त्याची दखल मुद्दाम घेतली नाही, असा अजित गव्हाणे यांचा आरोप आहे. विधानसभा निवडणुकीत खरा भ्रष्टाचार मतदारयाद्यांसह ईव्हीएमचा निवडक भाजप व महायुती केंद्रित वापर असा व्यापक असल्याचे ॲड. असीम सरोदे म्हटले आहे.