पिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) च्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सर्व कष्टकरी, कामगार व कर्मचारी संघटनांच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९.३० वाजता दापोडीतील शहिद भगतसिंग यांच्या पुतळ्यापासून, मुंबई पुणे महामार्गाने सरळ, निगडी येथील भक्ति शक्ती पुतळ्यासमोरील चौकात या रॅलीचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश इंटकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम म्हणाले की, गेल्या १० वर्षांत भाजपाच्या मोदी सरकारने कामगारांची अधिकाधिक कोंडी करण्यासाठी कामगार कायद्यांत, कामगार कायद्यांच्या अंमलबजावणी यंत्रणेत, इतकेच काय पण संबंधित न्यायप्रक्रियेतदेखील कामगारांवर गुलामी लादणारे बदल-हस्तक्षेप, केवळ बड्या कार्पोरेट्सना खुश करण्यासाठी केलेले आहेत. त्याचाच भाग म्हणून ४४ कामगार कायद्यांएवजी चार श्रमसंहिता आणण्यात आलेल्या आहेत. कामगारांना गेल्या ७५ वर्षात असणारे किमान संरक्षणदेखील काढून घेतले जाते आहे.

असंघटित कामगारांबाबत पोकळ प्रचारी आणि बोगस घोषणाबाजी करण्यापलिकडे या सरकारने काहीही केलेले नाही. आशा-अंगणवाडी-शालेय पोषण आहार इत्यादींना तर सरकारचे गुलाम असल्याप्रमाणेच राबविले जात आहेत. घर कामगार-बांधकाम कामगार, रिक्षावाले, हमाल इत्यादींची तर त्या नावाखाली फसवणूकच चालविली आहे. गेल्या १० वर्षात भाजपा सरकारने तर देशातील कामगार देशोधडीला लावला आहे. याच बड्या कार्पोरेट्सच्या लाभासाठी जनतेच्या सेवांचा बळी देऊन संरक्षण सामग्री उत्पादन, विमानतळ, बंदरे, खाणी, रेल्वे, बँका, विमा अन्य वित्तीय क्षेत्र, यांचे बेलगाम वेवंद खाजगीकरण करण्याची मोहीमच मोदी सरकार चालवित आहे.
या विरोधात गेली १० वर्षे इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी संजीवा रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील मध्यवर्ती कामगार संघटना तसेच स्थानिक पातळीवरील कामगार संघटना संयुक्तपणे सातत्याने सार्वत्रिक संप, निदर्शने, धरणे, सभा, मेळावे इत्यादी मार्गाने मोहीम राबवत आहेत, आंदोलने करत आहेत. त्यामुळे कामगार वर्गाच्या मूलभूत प्रश्नांबाबत व मागण्याबाबत ठोस भूमिका घेतली पाहिजे अशी भूमिका डॉ. कदम यांनी मांडली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश इंटक अध्यक्ष कैलास कदम, मुकेश तिगोटे, बाबासाहेब चव्हाण, मनोहर गडेकर, अनिल आवटी, विष्णूपंत नेवाळे, राजेंद्र खराडे, सुनिल देसाई, शशिकांत थुमाळ, सुनिल भालेकर, किशोर घडियार, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, नसिरूद्दीन इनामदार, हमिद इनामदार, कुमार मारणे, चेतन आगरवाल, तुषार पाटील, किशोर मारणे, सोपान भोसले, केनिथ रेमी, दिपक निनारीया, ज्ञानेश्वर मलशेट्टी, संतोष खेडकर, विलास शिर्के, संतोष पवार, राजू पातोंड, विकास साखरे, सोपान बरब्दे, किरण भुजबळ, विठ्ठल गुंडाळ, उत्तम गायकवाड, बसवराज शेट्टी आदी कामगार नेते व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.