मारूती भापकर यांची लाचलुचपत विभागात तक्रार
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेत रखवालदार पुरवठा करण्याच्या निविदेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मारुती भापकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सध्याचे प्रशासक आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता होत आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता सुरक्षा सेवा पुरवण्यासाठी तब्बल ११६ कोटी रुपयांची एकच निविदा काढण्यात आली असून, ती सिव्हिल सर्व्हिस गाईड लाईन्सचा भंग करून राबविण्यात आली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
या निविदेअंतर्गत १,१९४ कामगारांची आवश्यकता दर्शविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात १,५५२ कामगार काम करत आहेत. इतकंच नाही तर, पूर्वी ज्या निविदा प्रभागस्तरावर स्वतंत्र रीत्या काढून स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले जात होते, त्या पद्धतीला फाटा देत आता एकत्रित निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
भापकर यांच्या म्हणण्यानुसार, नव्या निविदा अटींमध्ये केवळ महाराष्ट्रातील अनुभवास प्राधान्य देण्याची अट घालण्यात आली असून, त्यामुळे केवळ काहीच कंपन्या पात्र ठरणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ‘नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस सैनिक इंटेलिजन्स’ (पूर्वीची ब्रिक्स), ‘स्मार्ट’ व अन्य दोन संस्थांना अन्यायकारकरीत्या पात्र ठरवण्यात आले असून, त्यांचा संबंध सत्ताधारी आमदार व मंत्र्यांशी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, ‘बि.व्ही.जी. प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘इगल सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांना अपात्र ठरवूनदेखील त्यांना महापालिकेच्या इतर कामांसाठी संधी दिल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे. त्यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेमध्ये सत्ताधारी व संबंधित अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त करत, त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
मारुती भापकर हे गेली ३० वर्षे भ्रष्टाचारविरोधी लढ्यात सक्रिय असून, पिंपरी चिंचवडमधील विविध घोटाळ्यांविरोधात आवाज उठवत आले आहेत. याही प्रकरणी त्यांनी संबंधित सर्व दस्तऐवजांसह लाचलुचपत विभागात तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.