दिवंगत अरुणकाका जगताप यांनी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. नगरपालिकेत ते नगरसेवक झाले. सलग पाच वर्ष ते तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. दोनवेळा ते विधानपरिषदेवर निवडून गेले. अहमदनगर शहर मतदारसंघातून मात्र ते दोनवेळा पराभूत झाले. महापालिकेत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. मात्र स्वत:ऐवजी त्यांनी त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप यांना महापौर केले. जिल्हा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. आर्युवेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते अनेक वर्षांपासून काम पाहत आहेत. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी क्रीडा क्षेत्रात ठसा उमटवला. घोडेस्वारी, नव्या गाड्यांचा छंद. शेती, उद्योग, हॉटेल व्यवसायात त्यांना विशेष रुची होती.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र ते सहा महिनेच तिथे रमले. पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येऊन त्यांनी संघर्ष केला. जिल्हा कॉंग्रेसचे कार्याध्यक्षपदही त्यांनी सांभाळले होते. त्यांचे चिरंजीव संग्राम जगताप हे सलग तीनवेळा अहिल्यानगर शहर मतदारसंघातून निवडून आले तर दुसरे चिरंजीव सचिन हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे ते व्याही होते. दिवंगत जगताप यांच्यावर आज सायंकाळी चार वाजता अहिल्यानगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव भवानीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.