पिंपरी (Pclive7.com):- राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज केल्याच्या प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांच्या पथकाने पुण्यात राहत असलेल्या व्यक्तीला भोसरी येथे बेड्या ठोकल्या आहेत.
अमोल काळे (वय २५) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली. त्याने आपणच पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेज केल्याची कबुली दिली. त्याला पुण्यातील भोसरी येथे अटक करण्यात आली.

पुण्यातील आरोपी मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना वारंवार कॉल करून आक्षेपार्ह बोलत होता. त्याचबरोबर अश्लील मेसेजही पाठवून त्रास देत होता. या प्रकरणी भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयातील सोशल मिडिया समन्वयक निखिल भामरे यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
निखिल भामरे यांनी मुंबई नोडल सायबर पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दिली आणि पोलिसांचे या प्रकाराकडे लक्ष वेधले. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७८ आणि ७९ नुसार गुन्हा दाखल केला होता.
भोसरी येथून आरोपीला अटक..
गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेत असताना तो पुण्यातील असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला भोसरी येथून अटक केली. आरोपीने पंकजा मुंडेंना कॉल आणि अश्लील मेसेज का पाठवले? त्याने कुणाच्या सांगण्यावरून हे केलं का? यात आणखी कोणी सहभागी आहे का? या अंगानेही पोलीस तपास करत आहेत. अमोल काळे याला पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यात आली. पण तो मूळचा बीड जिल्ह्यातील परळी येथील असल्याचीही माहिती आहे, पण याबद्दल दुजोरा मिळू शकलेला नाही.