रुद्रप्रयाग (Pclive7.com) : रुद्रप्रयागमध्ये स्थित केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहेत. त्यामुळं चारधामची यात्रा आता सुरू झाली आहे. देशभरातून लाखो भाविक केदारनाथांचं दर्शन घेण्यासाठी उत्तराखंडला येत असतात. बाबा केदारनाथाचे दरवाजे हे सहा महिने दर्शनासाठी बंद असतात. त्यानंतरचे सहा महिले हे दरवाजे पुन्हा एकदा भाविकांसाठी खुले केले जातात.
आज सकाळी ७ वाजता बाबा केदारचे दरवाजे भक्तांसाठी पूर्ण विधीपूर्वक उघडण्यात आले. दरवाजे उघडण्याच्या निमित्तानं केदारनाथ धाममध्ये १५ हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या प्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते. गुरुवारी सायंकाळी बाबा केदार यांची पंचमुखी चल विग्रह उत्सव डोली केदारनाथ धाममध्ये पोहोचली होती. केदारनाथ धाममध्ये पोहोचल्यानंतर बाबांची पालखी भांडारात ठेवण्यात आली.

यावेळी केदारनाथ मंदिराला १०८ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरातून बाबांची पालखी केदारनाथकडं रवाना झाली असताना हजारो भाविकही पालखीसोबत चालत केदारनाथला पोहोचले. आज सकाळी हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ मंदिरावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसंच भारतीय सैन्य दलाच्या बँड पथकानंही यावेळी वादन केलं.
यमुनोत्री आणि गंगोत्री धामांचे दरवाजे ३० एप्रिल रोजी उघडले आहेत. आता बद्रीनाथ धामचे दरवाजे ४ मे रोजी उघडणार आहेत. बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील, तेव्हा चारधाम यात्रा पूर्णपणे सुरू होईल. उत्तराखंडची ही चारधाम यात्रा पुढील ६ महिने सुरू राहणार आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये चारधाम यात्रा पूर्ण होते. त्यानंतर ६ महिने या धामांचे दरवाजे बंद राहतात.