पिंपरी (Pclive7.com):- लोकहिताच्या दृष्टिकोनातून ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्यात यावा, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केली आहे. यावेळी त्यांनी पुणे मेट्रो प्रशासनाचे संचालक अतुल गाडगीळ यांची भेट घेत निवेदन दिले.

याबाबत सचिन चिखले यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला लागून मावळ हा भाग येतो. सध्या पिंपरी ते भक्ती-शक्ती, निगडी मेट्रोचे काम प्रगतीपथावर चालु आहे. नुकतेच काही दिवसांपुर्वी महामेट्रोचे बजेट सादरीकरण झाले. या दरम्यान, संपूर्ण पुणे जिल्ह्यातील महामेट्रोचे सादरीकरण करण्यात आले तसेच बजेट विषयी व त्याचप्रमाणे पब्लिक ट्रान्सपोर्ट विषयी चर्चा करण्यात आली. पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या लगतच असणाऱ्या मावळ या भागातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी, कामगार, शेतकरी तसेच व्यावसायिक, कामगारवर्ग यांची मोठ्या प्रमाणात प्रवास चालु असतो.
दरम्यान, देहुरोड, तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा हा भाग मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्तीचा झाला आहे. शैक्षणिक प्रयोजन तसेच उद्योग, व्यावसायिक दृष्टिकोनातून येथील नागरिकांची पुणे व पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात लगबग असते. व्यावसायिक आणि कामगार वर्गासाठी मोठ्या प्रमाणावर दळणवळण म्हणजे व्यवसायातील विविध व्यक्ती, संस्था आणि उपक्रमांमध्ये संवाद साधणे, माहिती आणि वस्तूंची देवाणघेवाण करणे. यातून व्यवसायाची कार्यक्षमता, उत्पादकता आणि आर्थिक विकास वाढतो.

त्यामुळे लोकहिताच्या दृष्टीकोनातून ‘निगडी ते लोणावळा’ हा मेट्रो मार्ग होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी येणाऱ्या बजेटमध्ये आपण हा मार्ग घ्यावा व लवकर डिपीआर तयार करून मंजुर करावा, अशी मागणी सचिन चिखले यांनी केली आहे. यावेळी सचिन उदागे, दिपक खैरनार, प्रबुद्ध कांबळे तसेच गणेश वाघमारे उपस्थित होते.