भाजपा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक; महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचा सकारात्मक प्रतिसाद
पिंपरी (Pclive7.com):- मौजे चिखली आणि चऱ्होलीत महानगरपालिका प्रशासनाची प्रस्तावित TP Schem अखेर रद्द होणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे भूमिपुत्र आणि ग्रामस्थांना दिलासा मिळणार आहे.

चिखली, चऱ्होली येथील प्रस्तावित ‘टीपी स्कीम’ बाबत भाजपा आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक केली. सुमारे तीन तास सुरू असलेल्या बैठकीमध्ये लांडगे यांनी ग्रामस्थ, भूमिपुत्रांची भूमिका ठामपणे मांडली.
पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून 3 ते 4 वेळा आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनींचे शासनाच्या वतीने भूसंपादन करण्यात आले आहे. 1970 च्या दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगधंद्यांसाठी भूसंपादन केले, हा पहिला अन्याय झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करुन आमचा विरोध असतानाही जमिनी ताब्यात घेतल्या. टाटा मोटर्स कंपनीच्या विस्तारासाठी पुन्हा आमच्या जमिनींवर भूसंपादनाची कारवाई केली. त्यावेळीही आम्ही आंदोलन उभा केले होते. 1997 मध्ये ग्रामस्थांचा विरोध असताना गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्यात आला. प्रत्येकवेळी भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या भागात टीपी स्कीम लागू नये, अशी आग्रही भूमिका आमदार लांडगे यांनी आयुक्तांसमोर मांडली.

प्रस्तावित टीपी स्कीमबाबत चिखली आणि चऱ्होली या दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष होता. आमदार महेश लांडगे यांनीही सातत्याने टीपी स्कीमला विरोध केलेला आहे. त्यामुळे ‘टीपी स्कीम’ बाबत काय निर्णय होतो? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले होते. दरम्यान महापालिका आयुक्त रजेवर होते. आज आयुक्त महापालिकेत रुजू झाल्यानंतर तात्काळ बैठक घेण्यात आली. त्यामुळे आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश मिळताना दिसत आहे.
मौजे चिखली आणि चऱ्होलीत महानगरपालिका प्रशासनाने लादलेली TP Schem रद्द करण्याबाबत आम्ही संघर्षाची तयारी ठेवलेली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत टीपी स्कीम रद्द होण्याबाबत ‘ग्रीन सिग्नल’ दिलेला आहे. लवकरच याबाबत प्रशासन ‘नोटिफिकेशन’ काढेल असा विश्वास आहे. भूमिपुत्रांवर कोणताही अन्याय होऊ देणार नाही मी कायम त्यांच्या सोबत आहे.– महेश लांडगे,आमदार, भाजपा, पिंपरी- चिंचवड, पुणे.