जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आमदार महेश लांडगे यांना आश्वासन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील 42 ‘मिसिंग लिंक’ साठी दि. 25 मे पूर्वी भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी कालबद्ध नियोजन केले जाईल. त्या अनुशंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यवाही करणार आहे, असे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ मुळे रखडलेल्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.

भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवड शहराशी निगडीत विविध मुद्यांवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यामध्ये शहरातील वाहतूक सक्षमीकरणाच्या दृष्टीने ‘मिसिंग लिंक’, भूसंपादन, डुडुळगाव इको टुरिझम पार्क, महावितरण संबंधित कामांकरीता निधीची उपलब्धता, गायरान जमीन महापालिका हस्तांतरण प्रकरणे आदी मुद्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी नगर रचना विभागाचे उपसंचाक प्रसाद गायकवाड, भूसंपादन विभागाचे समन्वयक कल्याण पांढरे, सहायक नगर रचनाकार उषा विश्वासराव, उपअभियंता कुटे, भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, शहरातील 42 ‘मिसिंग लिंक’ साठी दि.25 मे पूर्वी भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी कालबद्ध नियोजन केले जाईल. भोसरी मतदार संघात महापालिकेच्या इ-फ-क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चऱ्होली, दिघी, चिखली या भागातील रस्त्याने विकसित होणारा परिसरामधील जमीन मालक यांचेकडून जागा ताब्यात घेण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येईल. तसेच, जागा ताब्यात न आल्यास भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले असेल, तर त्यावर प्राधान्याने कार्यवाही करावी. त्यासाठी आगामी दोन दिवसांत कामकाज सुरू करावे, असे आदेश भूसंपादन विभागास जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

गायरान जमीन हस्तांतरणाला गती..
भोसरी विधानसभा मतदार संघातील मोशी येथे आयआयएम नागपूर या संस्थेला आगाऊ ताबा देणेबाबत जदलगतीने कार्यवाही करण्यात येईल. तसेच, 220/33 केव्ही वीज उपकेंद्र उभारणीसाठी कागदपत्रांची लवकर पूर्तता झाल्यास जागा हस्तांतरणाची प्रक्रिया राबवण्यात येईल. तत्पूर्वी, मनपा प्रशासनाकडून आरक्षण फेरबदल करण्याची प्रक्रिया लवकर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केली आहे. तसेच, सफारी पार्कबाबत सुधारीत प्रस्ताव मनपा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयास तत्काळ प्रस्ताव दाखल करावा, असेही आदेश दिले आहेत.
शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या घरात आहे. नागरिकरण आणि औद्योगिकरण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतूक नियोजन आणि सक्षमीकरणासाठी प्राधान्याने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराचा उल्लेख ‘फ्युचर सिटी’ म्हणून केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील एकूण ४२ ‘मिसिंग लिंक’ चे काम पूर्ण करण्याबाबत पाठपुरावा करीत आहोत. दि. 25 मे पर्यंत रस्त्यांची कामे मार्गी लागतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यानी दिले आहे.– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.