
यापूर्वी, धर्मशाला येथे दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळलेला सामना गुरूवारी रद्द करण्यात आला होता. फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्यामुळे सामना थांबवण्यात आला आणि प्रेक्षक आणि खेळाडूंना मैदानाबाहेर काढण्यात आले होते. धर्मशाळेतील तांत्रिक बिघाडामुळे सामना रद्द करण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले होते. पण मीडिया रिपोर्टनुसार, सीमेवरील स्थिती पाहता हा निर्णय घेतला अशी प्राथमिक माहिती समोर आली होती. तथापि, गुरुवारपासूनच आयपीएल २०२५ हंगाम स्थगित केला जाईल अशी सांशकता व्यक्त केली जात होती.
आयपीएल २०२५ मध्ये, ५७ सामने यशस्वीरित्या पूर्ण झाले, तर ८ मे रोजी धर्मशाळा येथे खेळला गेलेला ५८ वा सामना (PBKS vs DC) सुरक्षेच्या कारणास्तव मध्येच थांबवण्यात आला. पाकिस्तानने जम्मूसह अनेक ठिकाणी ड्रोन हल्ले केले, जे भारतीय सैन्याने पाडले. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून, धर्मशाला येथे खेळला जाणारा सामना थांबवण्यात आला आणि खेळाडूंना हॉटेलमध्ये परत पाठवण्यात आले.
धर्मशाला येथे सामना थांबवल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू घाबरले होते. ऑस्ट्रेलियन माध्यमांमध्ये असा दावा केला जात होता की ‘रिकी पॉन्टिंगसह सर्व खेळाडू मायदेशी परतू इच्छितात. तथापि, धर्मशाला येथील विमानतळ बंद असल्याने सर्व खेळाडूंना ट्रेनने दिल्लीला आणले जाणार आहे. दरम्यान, फ्रँचायझी परदेशी खेळाडूंना परिस्थितीबद्दल माहिती देत आहे. तसेच त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था केली जात असल्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.
१६ सामने बाकी..
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “देश युद्धात असताना क्रिकेट सुरू आहे हे चांगले दिसत नाही.” आयपीएल २०२५ चा हंगाम अंतिम टप्प्यात होता आणि अंतिम सामन्यासह एकूण १६ सामने खेळायचे बाकी होते. अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाणार होता, परंतु भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे आयपीएल २०२५ चा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे.