पर्यावरण प्रेमींच्या मागणीला मोठे यश; आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा
भोसरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवडमधील मुळा, पवना आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये सुशोभिकरणावर भर देण्यापेक्षा प्रदूषण होणार नाही, अशा प्रकल्पांचा समावेश करावा. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्था- संघटनांच्या मागणीला मोठे यश मिळाले आहे.

नदी प्रदूषण आणि महानगरपालिकेचा नदी सुधार प्रकल्पातील त्रुटी याबाबत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांनी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, पर्यावरण प्रेमींनी सूचवलेले मुद्दे रास्त असून, त्याचा अंतर्भात नदी सुधार प्रकल्पामध्ये करावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्याला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील इंद्रायणी नदीचे होणारे प्रदूषण कमी करणे करिता मनपामार्फत इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला राज्य शासनाच्या अमृत योजनेतून निधी उपलब्ध होणार आहे. त्या करिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तांत्रित मान्यताही घेण्यात आली आहे.
तथापि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये पर्यावरण प्रेमी व विविध स्वयंसेवी संस्था संघटनांनी केलेल्या सूचनांचा समोवश करण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने इंद्रायणी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामामध्ये अमृत योजना मार्गदर्शनानुसार, आवश्यक त्या सुधारणा करुन प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करण्यात येत आहे. सदर प्रकल्पाची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुन राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवण्यात येणार आहे, असे लेखी पत्राद्वारे महानगरपालिका पर्यावरण विभागाने आमदार महेश लांडगे यांना कळवले आहे.
पिंपळे निलख येथील कामाला स्थगिती..!
दरम्यान, पिंपळे निखल येथे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत पुणे महापालिकेसोबत संयुक्तपणे वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंत (टप्पा- 1) नदी प्रदूषण कुमी करणे व पूर नियंत्रण विषयक काम सुरू होते. पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या या कामाला पर्यावरण प्रेमी आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांच्या प्रतिनिधी विरोध केला होता. या तक्रारींची दखल घेतली जाणार असून, या ठिकाणाच्या कामाचा फेरविचार करण्यासाठी तांत्रिक सल्ला घेण्यात येत आहे. त्यामुळे सदर कामाला तात्पुरत्या स्वरुपात पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
शहरातील जीवनवाहिन्या नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी नदी सुधार प्रकल्प राबवला जात आहे. हा प्रकल्प शहरातील नागरिकांसाठी आणि नागरी अरोग्य संवर्धनासाठी आहे. पर्यावरण प्रेमी, विविध स्वयंसेवी संस्था-संघटनांनी केवळ सुशोभिकरणावर भर न देता नदी प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जैवविविधा उद्यानांची निर्मिती, वृक्ष पुन:रोपण आणि लागवड असे मुद्दे सूचवले आहेत. त्याचा नदी सुधार प्रकल्पामध्ये समावेश करावा, अशी मागणी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. पर्यावरण प्रेमी, स्वयंसेवी संस्थांना अपेक्षीत असलेले शाश्वन नदी पुनरूज्जीवन करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.