पिंपरी (Pclive7.com):- अमृत भारत योजनेअंतर्गत चिंचवड, आकुर्डी, देहूरोड व तळेगाव दाभाडे या चार स्टेशनचा कायापालट केला जात आहे. कामात काही ठिकाणी त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करावी. कामाचा दर्जा राखावा, दर्जेदार काम करावे. मुदतीत काम पूर्ण करावे, अशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या.

खासदार बारणे यांनी गुरुवारी रेल्वे स्टेशनवर जाऊन कामाची माहिती घेतली. प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रेल्वे स्टेशन सुधार अंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती प्रवाशांना दिली. यावेळी पुणे अप्पर रेल्वे उपप्रतबंधक पद्मसिंह जाधव, पुणे मुख्य परियोजना प्रतिबंधक गती शक्ती युनिट संजय लोहत्रे, वरिष्ठ मंडल अभियंता विजय कुमार राय, वरिष्ठ मंडल विद्युत अभियंता पराग अकनुरकर, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक ए.के. पाठक, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख निलेश तरस, युवा सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस, प्रवासी संघटनेचे हेमंत टपाले, पोपट भेगडे, विजय पंडीत, सुरेश भोईर, दिपाली गोकर्णा, शिवसेना देहूगाव शहरप्रमुख सुनील हगवणे, भाजपचे रघुवीर शेलार, गुरूमुतसिंग रित्तू, शिवसेना देहूरोड शहरप्रमुख दिपक चौगुले, तळेगाव शहर प्रमुख देवा खरटमल, संजय पिंजन, अंकुश कोळेकर, दिलीप कुसाळकर, मुन्ना मोरे, सागर लांगे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, अमृत भारत योजनेअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील स्टेशनची कामे सुरू आहेत. रेल्वे स्टेशनवर बैठक कक्ष, लिफ्ट, पार्कींगची व्यवस्था आणि रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.चिंचवड, आकुर्डी, देहूरोड व तळेगाव दाभाडे स्टेशन सुधारण्याच्या कामात काही ठिकाणी त्रुटी आहेत. त्यात सुधारणा करावी. कामाचा दर्जा राखावा, दर्जेदार काम करावे. ही कामे पूर्ण करण्यासाठी डिसेंबर पर्यंत मुदत आहे. या मुदतीत कामे पूर्ण करावीत. तळेगाव दाभाडे स्टेशनसाठी ४० कोटी ३४ लाख, देहूरोडसाठी आठ कोटी पाच लाख, आकुर्डीसाठी ३३ कोटी ८३ लाख आणि चिंचवडसाठी २० कोटी ४४ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.
प्रवाशांच्या घेतल्या भेटी..
खासदार बारणे यांनी रेल्वे प्रवाशांच्याही भेटी घेतल्या. अमृत भारत योजने अंतर्गत रेल्वे स्टेशनचा कायापालट होत असल्याने प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले. अनेक वर्षांपासून रेल्वे स्टेशनची दुरवस्था होती. त्यात आता सुधारणा होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले.
दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू करा..
प्रवासी संघटनांनी केलेल्या सूचना महत्वाच्या आहेत. त्याही मार्गी लावाव्यात. पुणे ते लोणावळा ही दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू करावी. सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत धावली पाहिजे. या मागण्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मांडल्या आहेत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे नियोजन करून दुपारी दीडची लोकल पुन्हा सुरू करावी, अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.