
हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय २३, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम) हिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिचे वडील आनंद ऊर्फ अनिल बाळासाहेब कस्पटे (वय ५१, रा. वाकड) यांनी बावधन पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वैष्णवीचा पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा यांना १८ मे रोजी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, वैष्णवीचे सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे हे दोघे पसार होते.
सात दिवसांपासून हगवणे पिता-पुत्र पसार होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पाच तपास पथके रवाना करण्यात आली होती. अखेर या दोघांना शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आली. आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यांना सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची विनंती सरकारी वकील योगेश कदम यांनी केली. आरोपींकडून अॅड. शिवम निंबाळकर यांनी बाजू मांडली. भारतीय जनता पक्ष महिला आघाडीकडून न्यायालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.