पिंपरी (Pclive7.com):- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैष्णवी हगवणे यांच्या वडिलांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन हे वैष्णवी हगवणेंच्या माहेरी गेले होते, तेव्हा त्यांनी वैष्णवीचे वडिल अनिल कस्पटे यांच्या सोबत मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ कॉलद्वारे बोलणं करुन दिले.

यावेळी, वैष्णवीच्या वडिलांनी दोन महत्त्वाच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांची नियुक्ती करण्याची मागणी अनिल कस्पटे यांनी केली. त्यावर, वकिलासंदर्भातील मागणी मुख्यमंत्र्यांनी लागलीच मान्य देखील केली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन आता सरकार अधिक गंभीर झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील व्हिडिओ कॉलद्वारे अनिल कस्पटे यांच्याशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले. सरकार आपल्या पाठीशी आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला.
दरम्यान, आरोपींना न्यायालयात कठोर शिक्षा होईल, त्याअनुषंगाने पावलं उचलायला सांगितले आहेत. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालेल, तातडीनं निकाल लागेल. कारण, ही अतिशय वेदनादायक घटना आहे, असे अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांची भेट घेतल्यानंतर स्पष्ट केले.























Join Our Whatsapp Group