पिंपरी (Pclive7.com):- शहरातील वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. ही आत्महत्या नसून सरळसरळ हत्या आहे, असा ठाम आरोप अनुरूप जोडी विवाह संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रोहिणी रासकर यांनी केला आहे. त्यांनी प्रकरणातील आरोपी पती, सासू, नणंद, सासरे, दीर यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी संतप्त मागणी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, “हुंडा नको म्हणणारे, पण ‘इज्जतीप्रमाणे’ काही तरी द्या म्हणणाऱ्यांपासून सावध रहा. हीच मंडळी नंतर मुलींचा छळ करतात. मुलगी ही केवळ संसारासाठी दुसऱ्या घरात जाणारी वस्तू नाही. तिचेही स्वप्नं, भावना असतात. तिचा आदर करा,” असं रोहिणी रासकर यांनी ठामपणे सांगितलं. लग्न म्हणजे केवळ वय नव्हे, ती एक जबाबदारी आहे.फक्त वय झालं म्हणून मुलीचं लग्न करू नका, असं आवाहन करत रोहिणी रासकर म्हणाल्या, “ती आपल्या घरातून दुसऱ्या घरात जाते, तिथे तिचं भावनिक व मानसिक आयुष्य कसं असेल याचा विचार करा. पालकांनी इज्जतीपेक्षा आपल्या मुलीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं.”
या प्रकरणात वैष्णवीचा नवरा व सासरच्या मंडळींकडून वारंवार हुंड्याची मागणी व छळ झाल्याची माहिती सोशल मीडियावर समोर आली आहे. त्यापुढे म्हणाल्या की, “ही केवळ एक वैष्णवीची कहाणी नाही, अशा अनेक मुली समाजात दररोज बळी पडत आहेत. हे थांबवायचं असेल, तर आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. जर पोलीस कारवाई करत नसतील, तर आम्ही महिलांनीच ती जबाबदारी स्वीकारू.”
मुलीने एकतर्फी प्रेम करू नयेत का? – पालक केवळ ‘इज्जतीसाठी’ गप्प का बसतात? – महिला स्वतः कधी सक्षम होणार? – समाज अजूनही हुंडा घेणाऱ्यांना समर्थन का देतो? सदर प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पोलिसांनी काही आरोपींना अटक केल्याचे समजते. मात्र, या घटनेनंतर समाजात व्यापक चर्चेला सुरुवात झाली आहे. वैष्णवीच्या मृत्यूमुळे केवळ तिचं आयुष्य संपलं नाही, तर समाजासाठी आरसा दाखवणारा धक्का बसला आहे.हुंड्यासाठी होणारे अत्याचार थांबवायचे असतील, तर दोषींना उघडपणे शिक्षा झाली पाहिजे. फाशीची शिक्षा दिल्यास समाजाला शिकवण मिळेल आणि भविष्यात अशा घटना रोखता येतील असे मतही त्यांनी व्यक्त केले.