चिंचवड (Pclive7.com):- ‘मदतीसाठी सदैव तत्पर आम्ही’ या ब्रीदवाक्याला साजेशी कृती करत चिंचवड येथील आनंदी मैत्री प्रतिष्ठान या संस्थेने थेरगाव येथील पालावर जाऊन पावसाने संकटात सापडलेल्या एका मेंढपाळ कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे मेंढपाळांचे हाल झाले. त्यांचे पाल पाण्याखाली गेले. पावसामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे वृत्त माध्यमामध्ये प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आनंदी मैत्री प्रतिष्ठानने या कुटुंबाची माहिती घेतली.
हे कुटुंब पहिल्या ठिकाणाहून दुसरीकडे म्हणजे थेरगाव येथे स्थलांतर झाल्याचे कळाले. मग, तिथे जाऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या कुटुंबाला मदत केली. पावसाळ्यात तीन महिन्यांपुरते पुरेल इतके घरगुती किराणा साहित्य देण्यात आले. यात गहू, तांदूळ, डाळी, पीठ, साखर, तेल, मसाले आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता.

या उपक्रमात आनंदी मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश लुंकड, कोषाध्यक्ष विकास पाटील, सदस्य सचिन गाडेकर, बाळासाहेब गायकवाड, सचिव योगिता लुंकड यांनी सहभाग घेतला.






















Join Our Whatsapp Group