वाकड (Pclive7.com):- अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना वाकड पोलिसांच्या तपास पथकाने कस्पटे चौक परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक बनावट पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रणव प्रकाश शेवाळे (२०, रा. वनदेवनगर, थेरगाव), औदुंबर ऊर्फ मोन्या रविंद्र नाकते (२९, रा. गोखले नगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी पोहवा वंदू गिरे यांना दोन व्यक्ती कस्पटे चौक परिसरातील बंद पुलाजवळ अवैध अग्निशस्त्रांसह येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळले.

आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद
आरोपी प्रणव शेवाळे याच्याविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात आधीपासूनच चोरी व मारहाणीचे गुन्हे नोंद आहेत. औदुंबर नाकते हा चतुःश्रृंगी, हिंजवडी व पौड पोलिस ठाण्यांतील अनेक गंभीर गुन्ह्यांतील (खून, जबर चोरी, मारहाण, शस्त्र बाळगणे इ.) सराईत आरोपी असून, काही गुन्ह्यांत तो अद्यापही पोलिसांना ‘पाहिजे’ आहे.

.. यांनी केली कामगिरी
उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक सुभाष चव्हाण, उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, विभीषण कन्हेरकर, अंमलदार चंदू गिरे, संदीप गवारी, कौर्तेय खराडे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, सचिन गायकवाड, विजय घाडगे, दीपक साबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
