रहाटणी (Pclive7.com):- रहाटणी येथे आमदार आपल्या दारी हा उपक्रम नुकताच पार पडला. यावेळी येथील रहिवासी विवेक विजय कासट यांनी एका रस्त्यात अनेक खड्डे झाल्यामुळे वाहतुकीस त्रास होत असल्याकडे लक्ष वेधले. त्यांच्या ही समस्या आमदार शंकर जगताप यांनी जाणून घेत तातडीने प्रशासनाला याबाबतच्या सूचना केल्या होत्या. आणि काही दिवसातच या रस्त्याची दुरुस्ती झाल्यामुळे रहिवासी विवेक विजय कासट यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाने ठोस परिणाम दिला आहे. २४ एप्रिल रोजी आयोजित या उपक्रमात आमदार शंकर जगताप यांनी नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश दिले होते.

नागरिकांसाठी संवादाचे खुले व्यासपीठ
प्रभाग २७ मधील नागरिकांना शासकीय कामकाज आणि महानगरपालिकेशी थेट संवाद साधण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरले आहे. रहाटणी येथील विवेक विजय कासट, वरिष्ठ IT व्यवस्थापक आणि रहिवासी यांनी रस्त्यांची दुर्दशा, भटक्या कुत्र्यांचा त्रास आणि परिसरातील झोपडपट्टीतील सार्वजनिक शौचालयाच्या अभावामुळे होणाऱ्या त्रासावर लेखी निवेदन सादर केले होते.

रस्त्याच्या समस्येवर तातडीचा उपाय आणि ठोस आश्वासन
रहाटणी येथील फाउंटन हॉटेल ते स्वामी समर्थ मठ मार्गावरील खराब रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. खड्डे बुजवले गेले आणि पावसाळ्यानंतर संपूर्ण रस्त्याची पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन देण्यात आले. विवेक कासट यांनी सतत पाठपुरावा करून अधिकाऱ्यांना त्वरीत कार्यवाहीस प्रवृत्त केले.
महापालिका अधिकाऱ्यांची तत्परता आणि सकारात्मकता
श्रीमती मनाली स्वामी (जलनिस्सारण विभाग), श्री. चंद्रकांत गुंडाल (नगररचना विभाग) आणि श्री. मनोज बोरसे (वरिष्ठ अधिकारी, स्थापत्य विभाग) यांनी समन्वय ठेवत समस्या वेगाने सोडवली.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पुढील अपेक्षा
रहिवाशांनी आमदार शंकर जगताप यांच्या तातडीच्या निर्णय क्षमतेचे कौतुक केले आहे. आणि पुढील नागरी समस्याही लवकर मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. आमदार आपल्या दारी हा उपक्रम नागरिकांसाठी आश्वासक ठरत असून, रहाटणीसाठी सुशासनाची नव्या उंचीवरील पायवाट ठरत असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.