पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या महाळुंगे दक्षिण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. खालुंब्रे गावात एका ३ वर्षांच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली.

या धक्कादायक प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगा हा मूळचा मध्य प्रदेशचा असून त्याचे कुटुंब खालुंब्रे येथे भाड्याने राहत होते. काल संध्याकाळी तो घरासमोर खेळत असताना बेपत्ता झाला होता. आरोपीने त्याचे अपहरण करून निर्जन ठिकाणी नेले, तिथे त्याच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर गळा चिरून त्याची हत्या केली.

घटनेचे गांभीर्य ओळखून महाळुंगे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला. आरोपी हा मूळचा बिहारचा असून तो गुन्हा करून राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत होता.

मात्र, तो रेल्वे पकडण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पुणे रेल्वे स्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले. या घटनेमुळे खालुंब्रे परिसरात संतापाची लाट उसळली असून, परिसरात शोककळा पसरली आहे. महाळुंगे दक्षिण पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.




















Join Our Whatsapp Group