पुणे (Pclive7.com):- नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून समाजमनाला हादरवणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे येथील धायरी येथे जाऊन पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्याशी संवाद साधला. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास त्यांना दिला.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. या प्रकरणात खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्युदंडापर्यंतची शिक्षा होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे सांगितले.

दरम्यान, हे अमानुष कृत्य करणारा आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरोधात सबळ पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र लवकरात लवकर न्यायालयात दाखल करण्याच्या सूचना संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

सदर प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात येणार असून यासाठी विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार आहे. तसेच पॉक्सो कायद्यानुसार आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी संबंधित यंत्रणांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश देण्यात आले असून, दोषींना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असा ठाम इशाराही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिला.




















Join Our Whatsapp Group