पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील वायू प्रदूषण रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्रकल्पांवर विशेष तपासणी मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून, धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर दिला जात आहे.

महापौर रवि लांडगे यांच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या या कारवाई दरम्यान महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने पुनावळे, मोशी आणि पिंपळे सौदागर परिसरातील १० आरएमसी प्रकल्पांची पाहणी केली. तपासणीदरम्यान ४ प्रकल्पांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत नसणे, परिसरात स्वच्छतेचा अभाव, तसेच कच्चा माल उघड्यावर साठविण्यात येत असल्याने धूळ प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले.

याअनुषंगाने फरांदे आरएमसी प्रकल्प, मोशी, यश आरएमसी प्रकल्प, चिंचवड, राम ग्रुप क्रिस्टल वन आरएमसी प्रकल्प, मोशी तसेच आसवानी असोसिएट्स जी.के. आरएमसी प्रकल्प, पिंपळे सौदागर या चार प्रकल्पांना तात्काळ लाखबंद (सील) करण्यात आले आहे.
दरम्यान, इतर प्रकल्पांना धूळ नियंत्रणासाठीच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमांचे पालन न केल्यास पुढील टप्प्यात अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे. शहरातील आरएमसी प्रकल्पांसह बांधकाम आणि औद्योगिक प्रकल्पांवर महापालिकेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

पर्यावरण विभागाकडून प्रदूषण नियंत्रणासाठी अशा तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत. शहरातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील धूळ प्रदूषण हे नागरिकांच्या आरोग्यासाठी धोका ठरू शकते आणि याकडे दुर्लक्ष करण्याची महापालिकेकडे अजिबात मुभा नाही. आरएमसीसह सर्व बांधकाम प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांचे केवळ पालनच नाही तर जबाबदारीने अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई ही केवळ औपचारिकता नसून ती सातत्याने आणि कठोरपणे सुरू राहील. नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरण देणे ही महापालिकेची जबाबदारी असून त्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

“शहरातील वायू प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळविणे ही महापालिकेची सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. बांधकाम व औद्योगिक प्रकल्पांनी पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक असून, कोणत्याही प्रकारचा नियमभंग सहन केला जाणार नाही. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर सातत्याने कारवाई करून शहरातील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
“प्रदूषण नियंत्रणासाठी केवळ नियम बनविणे पुरेसे नसून त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरएमसी प्रकल्पांमध्ये आवश्यक प्रदूषण नियंत्रण उपाययोजना न आढळल्यास तात्काळ कारवाई करण्यात येत आहे. पुढील काळातही तपासणी मोहीम अधिक तीव्र करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.”– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका.




















Join Our Whatsapp Group