पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील कु. कियान्श शर्मा याने आपल्या अफाट बुद्धिमत्ता, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ‘MaRRS International Spelling Bee Competition’ च्या आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीत कियान्शने जगभरातील स्पर्धकांना मागे टाकत तृतीय क्रमांक पटकावला आहे.

कियान्श हा पिंपळे सौदागर येथील VIBGYOR Rise Schoolचा विद्यार्थी असून, २६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे झालेल्या अंतिम फेरीत त्याने ही दैदिप्यमान कामगिरी केली. या स्पर्धेत विविध देशांतील गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण आणि चुरशीच्या फेऱ्यांमध्ये कियान्शने आपल्या शब्दसामर्थ्याची आणि एकाग्रतेची छाप पाडली. कियान्शचा हा यशस्वी प्रवास शालेय स्तरावरील स्पर्धांपासून सुरू झाला. त्यानंतर आंतरशालेय, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक कठीण टप्पे पार करत त्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.

कियान्शच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना शत्रुघ्न काटे म्हणाले, “पिंपळे सौदागरमधील एका चिमुकल्याने जागतिक स्तरावर शहर आणि देशाचे नाव उज्ज्वल केले, याचा आम्हाला अभिमान आहे. कियान्शचे यश हे त्याच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि जिद्दीचे फळ आहे. तो आजच्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.”

या सत्कार समारंभाला कियान्शचे पालक, शिक्षक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्याच्या या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




















Join Our Whatsapp Group