रेडझोनच्या विरोधात यमुनानगर परिसरातील नागरिकांकडून १३१ हरकती दाखल; युवासेनेची आक्रमक भूमिका; प्रशासना विरोधात संताप
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात (डीपी) देहूरोड संरक्षण विभागाच्या हद्दीची अर्थात रेडझोन सीमा दर्शवली. यमुनानगर, त्रिवेणीनगर, रुपीनगर, म्हेत्रेवस्ती, साने चौक, ज्योतिबानगर अशा नागरी वस्तीचा त्यात समावेश आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांमधील संभ्रम दूर करून कायदेशीर रित्या याबाबत लढा देण्यासाठी शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. नागरिकांना यानंतर काय करता येईल याची माहिती दिली. त्यानंतर तब्बल 131 नागरिकांनी या रेड झोन बाबत हरकती नोंदविल्या असून या हरकती पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला शुक्रवारी देण्यात आल्या.

याबाबत युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे हरकती दाखल केले आहेत. याशिवाय रस्त्यावर उतरून संघर्षाची देखील तयारी नागरिकांनी युवा सेनेच्या माध्यमातून केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी शहरासाठी प्रारूप विकास आराखडा (डीपी) १४ मे रोजी मंजूर केला आहे. त्यावर ६० दिवसांत म्हणजेच १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवल्या आहेत. या डीपीमध्ये पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांच्या पूररेषांसह रेडझोनची सीमाही दर्शविल्या आहेत. यामध्ये दिघी, देहूरोड, औंध कॅम्प, डेअरी फार्म या लष्करी आस्थापनांचा समावेश आहे. दिघी व देहूरोड आस्थापनांमुळे संरक्षित क्षेत्र (रेडझोन) दर्शविले आहे. त्यामुळे भोसरी, चऱ्होली, वडमुखवाडी, दिघी आणि तळवडे, चिखली, निगडी, रावेत, किवळे या गावांच्या काही भाग बाधित होत आहेत. रेडझोनची हद्द दोन हजार यार्ड असल्यामुळे बाधितांची संख्या अधिक आहे. त्यामुळे हे क्षेत्र पाचशे यार्डपर्यंत कमी करण्याची वर्षानुवर्षांची मागणी आहे. या संदर्भात संरक्षण विभागासमवेत बैठकीही झाल्या आहेत. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असे असताना डीपीमध्ये मात्र रेडझोनची सीमा नमूद केलेली आहे. त्यामुळे बाधित होणारे क्षेत्र दर्शविले आहे. सेक्टर २१ मधील काही भाग, सेक्टर २२ या नागरी वस्तीसह रुपीनगर, सहयोगनगर , त्रिवेणीनगर, तळवडे, चिखलीतील म्हेत्रे वस्ती, साने चौकाचा काही भाग रेडझोनमध्ये दिसत आहे. त्यामुले सर्वसामान्य नागरिकांमध्ये घबराटीचे व संभ्रमाचे वातावरण आहे.
दरम्यान, प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्याबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. त्यासाठी ६० दिवसांचा कालावधी नागरिकांना दिला आहे. त्यानंतर हरकती व सूचनांवर सुनावणी होईल. नागरिकांनी रेड झोनविरोधात हरकती दाखल केल्या आहेत. या हरकती प्रशासनाकडे यमुना नगर परिसरातील नागरिकांसहित युवा सेनेचे अजिंक्य उबाळे तसेच अनिकेत येरूनकर, अमित शिंदे , किरण वाडकर, अभिषेक सुरवसे, शुभम महाडिक यांनी दाखल केल्या. हरकतीसोबत राज्य शासनाकडे देखील याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास हा प्रकार देखील आणून देण्यात आला आहे.
नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना नेहमीच आक्रमक भूमिका घेत आली आहे. या भागातील रेडझोन हद्दीबाबत केंद्र शासन, राज्य शासन यांच्याकडे देखील पाठपुरावा केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या घरांना धक्का लागणार नाही यासाठी शेवटपर्यंत आपण लढा देणार असल्याचा निर्धार नागरिकांसोबत केला आहे.– अजिंक्य रामभाऊ उबाळेअध्यक्ष युवा सेना शिरूर लोकसभा (भोसरी, आळंदी, खेड)






















Join Our Whatsapp Group