पिंपरी (Pclive7.com):- पुनावळे परिसरातील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, आरोग्य विषयक प्रश्न अशा विविध समस्या सोडवा अशा मागणीचे निवेदन पुनावळे येथील 7 प्लुमेरिया ड्राईव्ह सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आले.

यावेळी 7 प्लुमेरिया ड्राईव्ह सहकारी गृहनिर्माण संस्थेचे गणेश भामे (चेअरमन), शिवराज हराळे (सेक्रेटरी), भारत पाटील, राहुल पवार, अतुल कुलकर्णी, सागर शिंदे (युवासेना उपाध्यक्ष चिंचवड विधानसभा) उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 7 प्लुमेरिया ड्राईव्ह सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, पुनावळे परिसरात नागरी समस्या दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहेत. तरी आपण लक्ष घालून प्रशासनाला या समस्या तातडीने सोडवण्याचा सूचना कराव्यात अशी मागणी सोसायटी धारकांनी केली आहे.

या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी..
०१. पुनावळे गाव ते 7 प्लुमेरिया ड्राईव्ह सोसायटी दरम्यानचा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे असून वाहनचालक व पादचारी दोघांनाही अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने दुरुस्ती व डांबरीकरण करण्यात यावे.
०२. 7 प्लुमेरिया ड्राईव्ह सोसायटीसमोर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. त्यामुळे या साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी व डासांची उत्पत्ती होत असून अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका आहे. या ठिकाणी साचलेल्या पाण्याचा निचरा व नाल्यांची योग्य व्यवस्था करणे आवश्यक आहे.

०३. बीआरटी रोड (समाधान हॉटेल) ते 7 प्लुमेरिया ड्राईव्ह सोसायटी दरम्यानचा रस्ता तसेच रिंगरोडकडे जाणारा पुढील मार्ग सुद्धा खराब अवस्थेत आहे. पावसामुळे चिखल, घाण व घसरटपणा यामुळे नागरिकांना व विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे.
०४. समाधान हॉटेल परिसरात सतत होणारी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येत आहेत. यासाठी समाधान हॉटेलजवळ अंडरबायपासचा पर्याय विचारात घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने नियोजन करावे.
मावळ लोकसभा मतदार संघातील नागरी समस्यांकडे आपण संवेदनशीलपणे लक्ष देत आला आहात. पुनावळे परिसरातील सोसायटी धारकांच्या या समस्यांकडे तातडीने लक्ष दिल्यास आम्ही अत्यंत आभारी राहू. तरी संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना देऊन आवश्यक उपाययोजना कराल, अशी अपेक्षा सोसायटी धारकांनी व्यक्त केली आहे.






















Join Our Whatsapp Group