पिंपरी (Pclive7.com):- प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान दरीत कोसळून झालेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सुरुवातीला हा अपघात वाटत असला, तरी सिया गोयल या केतनच्या होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने केतनचा काटा काढल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे.

या हाय-प्रोफाइल घटनेमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली असून पोलिसांनी केतनच्या होणाऱ्या पत्नीची आणि तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत केतन अग्रवाल हा नामवंत व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. त्याचा विवाह मार्केटयार्डातील मसाल्यांचे मोठे व्यापारी गोयल यांची कन्या सिया गोयल हिच्याशी निश्चित झाला होता. जयपूर येथे अत्यंत थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडणार होता आणि त्यासाठी दोन विमानेही बुक करण्यात आली होती.

मात्र, सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. या विवाहासाठी तिचा विरोध असल्याने तिने केतनला कायमचे वाटेतून हटवण्याचा भयानक कट रचला. गुरुवारी सियाचा वाढदिवस होता. याचेच निमित्त साधून केतन आणि सिया हे दोघे लोहगडावर ट्रेकिंगसाठी गेले होते. तिथे फोटोसाठी पोज देत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला, असा बनाव सुरुवातीला रचण्यात आला होता. मात्र, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल तपास केला असता हा घातपात असल्याचे समोर आले. सियाच्या प्रियकरानेच केतनला लोहगडावरून थेट खोल दरीत ढकलून दिले होते, ज्यामध्ये जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत होणारी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या हत्याकांडात सियाचा थेट सहभाग कितपत आहे, तसेच तिच्या प्रियकराला मदत करण्यासाठी आणखी कोणाची साथ लाभली होती का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. या धक्कादायक मर्डर मिस्ट्रीच्या उलगड्यामुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे.




















Join Our Whatsapp Group