महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड आणि इतर अनुषंगिक कार्यालयांसाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाच्या अधिपत्याखालील २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, यासंदर्भातील शासन निर्णय येत्या काही दिवसांत जारी होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. तसेच, याबाबत महिन्याभरात मंत्रिमंडळात आवश्यक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनासाठी स्वतंत्र आणि सुसज्ज मुख्यालय उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा आमदार महेश लांडगे यांनी राज्य शासनाकडे केला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसत आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. यावेळी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे,
मंत्रिमंडळाच्या दि. १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत ताथवडे येथील वळुभाता प्रक्षेत्रातील एकूण ६७.९४ हेक्टर क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय, परेड ग्राऊंड व इतर आवश्यक कार्यालयांसाठी हस्तांतरित करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार गृह विभागाने महसूल विभागाकडे आवश्यक कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठविला आहे.
या प्रस्तावासंदर्भात काही विभागांकडून अभिप्राय मागविण्यात आले होते. पशुसंवर्धन विभागाने संबंधित जागेची आवश्यकता असल्याचे नमूद केले असले, तरी शहराच्या कायदा व सुव्यवस्था व्यवस्थेसाठी आधुनिक पोलीस मुख्यालयाची गरज लक्षात घेऊन शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आमदार महेश लांडगे यांनी याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूल आणि गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे पोलीस आयुक्तालयासाठी स्वतंत्र प्रशासकीय संकुल उभारण्याचा महत्त्वाचा टप्पा आता पूर्णत्वास येत आहे.
यासंदर्भात आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवड हे राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक आहे. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त पोलीस आयुक्तालय उभारणे अत्यावश्यक होते. राज्य शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच अंतिम निर्णय होईल. त्यामुळे शहराच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.”
“पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढत्या विस्तारामुळे स्वतंत्र आणि अत्याधुनिक पोलीस आयुक्तालयाची गरज अनेक वर्षांपासून भासत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात स्वतंत्र आयुक्तालय सुरू झाले. आता ताथवडे येथे पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय उभारण्यासाठी आवश्यक जमीन हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिले असून, येत्या महिनाभरात मंत्रिमंडळात निर्णय होण्याची अपेक्षा आहे. पोलीस प्रशासनाला सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल आणि नागरिकांना अधिक प्रभावी व जलद सेवा मिळेल. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षित आणि नियोजित विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.