पिंपरी (Pclive7.com):- किवळे येथील कस्तुरी होम सोसायटी ते रूणाल गेटवे सोसायटी पर्यंतच्या 18 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी युवासेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र तरस यांनी चिखलात बसून आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

राजेंद्र तरस यांनी म्हटले आहे की, किवळे सर्व्हे नंबर 96 या ठिकाणी अनेक वर्षापासून रुणाल गेटवे, G T प्राईड, कस्तुरी होम, मारवल, आर्यमन, जीके, मंगलम यासह अनेक सोसायटी या भागात असून महानगरपालिकेने 18 मीटर डीपी रोड मंजूर करून अनेक वेळा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही हा रोड विकसित केलेला नाही. सध्याच्या परिस्थितीत पाऊस सुरू असल्याने सर्व नागरिकांना चिखल तुडवत सोसायटीत स्वतःच्या फ्लॅटमध्ये जावे यावे लागत आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले सर्वांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेले अनेक दिवस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून या रोड करण्यासंदर्भात अनेक वेळा राजेंद्र तरस यांनी वेळोवेळी संपर्क साधून सदर परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिलेली. अनेक वेळा पत्र देऊनही त्यांनी पत्राची दखल घेतली नाही.

अखेर सर्व सोसायटी धारकांना सोबत घेऊन या रस्त्यावर चिखलात बसून शिवसेनेचे युवानेते राजेंद्र तरस यांनी आंदोलन केले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, त्याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, धर्मपाल तंतरपाळे, बापू कातळे आदी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने उप अभियंता स्वप्निल शिर्के, कनिष्ठ अभियंता अमोल पवार हे या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व येत्या आठ दिवसांमध्ये एमपीएम पद्धतीचा डांबरीकरण करून देऊन असा शब्द दिला व हे आंदोलन सोडा म्हणून विनंती केली. तसेच सोसायटी धारकांनी देखील आंदोलन सोडावा अशी विनंती राजेंद्र तरस यांना केली, तेव्हा हे आंदोलन या ठिकाणी सुटले.

परंतु जर हा रस्ता डांबरीकरण झाला नाही तर पुढील आंदोलन हे संपूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात चिखल टाकून त्या ठिकाणी होणार आहे याची दखल महानगरपालिकेने घ्यावी व लवकरात लवकर हा रोड करून द्यावा, असा इशारा राजेंद्र तरस यांनी प्रशासनाला दिला आहे.






















Join Our Whatsapp Group