
पिंपरी (Pclive7.com):- वाहतूक नियोजनासाठी नेमलेल्या ट्रॅफिक वॉर्डनने पैशांची मागणी केल्याने नागरिकांनी त्याला चोप दिला. ‘साहेबांनी पैसे घ्यायला सांगितले आहे’, अशी कबुली वॉर्डनने दिली असल्याची माहिती मिळत आह. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील तालुक्यातील उर्से टोलनाका येथे सोमवारी (दि.११) दुपारी साडेबारा वाजता घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मावळ उर्से टोलनाका येथे देहूरोड वाहतूक विभागाकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात येते. वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी या ठिकाणी वाहतूक सहायक म्हणजेच ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केली आहे. यातील एक ट्रॅफिक वॉर्डन रस्त्यावरील गाड्या अडवून त्यातील नागरिकांकडून पैसे घेत होता.

या प्रकाराने संतप्त झालेल्या वाहनचालक आणि इतर नागरिकांनी त्याला जाब विचारत चोप दिला. तुला गाड्या अडवायचा अधिकार कोणी दिला, तू पैसे कसे मागतो, कोणी पैसे वसूल करायला सांगितले, असा सवाल केला. चोप दिल्यानंतर वॉर्डनने रडायला सुरुवात केली. ‘साहेबांनी सांगितले आहे पैसे घ्यायला’, अशी कबुली त्याने दिली असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांसमोरच वॉर्डनला मारहाण..
वॉर्डनला मारहाण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये नागरिक शिवीगाळ करत वॉर्डनला मारहाण करत आहेत. हा प्रकार घडत असताना वाहतूक पोलिस तेथे उपस्थित असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी त्यालाही जाब विचारल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.























Join Our Whatsapp Group