चिंचवड (Pclive7.com):- सौ. किर्तीमाला दिनकर वाणी (वय ५३) यांच्या अकस्मात निधनाने मोहननगर चिंचवड परिसरात शोककळा पसरली असताना, त्यांच्या मुलाने व कुटुंबीयांनी घेतलेल्या उदात्त निर्णयामुळे चार रुग्णांना नवे जीवन मिळाले आहे. किर्तीताईंच्या दोन्ही मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुस आणि यकृत (लिव्हर) हे अवयव प्रत्यारोपणासाठी दान करण्यात आले.

लहानपणापासून कृष्णभक्तीत रमलेल्या किर्तीताईंनी आपले संपूर्ण आयुष्य कृष्ण नामात आणि भक्तीमार्गात व्यतीत केले. नियतीच बघा.. गोकुळ अष्टमीच्या पवित्र दिवशीच त्यांनी देह ठेवला आणि त्याच क्षणी त्यांच्या अवयवदानामुळे चार कुटुंबांना आनंद आणि आशा मिळाली. मृत्यूनंतरही दुसऱ्यांना जीवनदान देणारे हे कार्य त्यांच्या भक्तिमय आणि सेवाभावी जीवनाला खऱ्या अर्थाने दिव्य पूर्णविराम ठरले.

त्यांच्या अंत्यविधी वेळी जमलेल्या समाज बांधवानी सांगितले “किर्तीताई म्हणजे भक्तिभाव, अभ्यासू वृत्ती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचे उत्तम उदाहरण होत्या. आता मृत्यूनंतरही त्यांनी चार जणांना जीवनदान दिले. ही त्यांची सर्वात मोठी सेवा आहे.”

परिसरातील नागरिक व नातेवाईकांनी या कार्याचे मनःपूर्वक स्वागत करून कीर्तीताईंच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यांच्या या उदात्त कार्यातून अनेकांना अवयवदान करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
किर्तीताईंना आपल्या सर्वांकडून भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏
ॐ शांती शांती शांती 🙏🙏🙏























Join Our Whatsapp Group