पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त शेखर सिंह यांची बदली झाली आहे. महापालिका निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना जाहीर होऊन चोवीस तास ही उलटले नाहीत. तोपर्यंत शेखर सिंह यांची बदली झाली, प्रभाग रचनेत संभाव्य बदल न घडल्यानं हे बदली झाल्याची चर्चा रंगली आहे.

शहरातील ३२ प्रभागांची जाहीर झालेली रचना ही भाजपसाठी अनुकूल असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी प्रतिकूल ठरणार आहे. अजित पवारांच्या अनेक शिलेदारांनी प्रभाग रचनेत बदल घडवण्यासाठी मोठी ताकद लावली होती. आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ससेमिरा ही लावला. परंतु पहिल्या दिवसापासून भाजपच्या हिताची कामं करणारे आयुक्त म्हणून ख्याती मिळवलेले शेखर सिंह प्रभाग रचनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अपेक्षित प्रभाग रचना बनवणार नाहीत, हे उघड होतं.
प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली, तेंव्हाचं याची प्रचिती सर्वांना आली. २०१७ ला भाजपला सत्तेत आणण्यात फायद्याची ठरलेली प्रभाग रचना, आत्ता ही कायम ठेवण्यात आली. सूचना आणि हरकतींमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रमाण अधिक होतं, सुनावणीत ही राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी आगपाखड ओखली. मात्र प्रत्यक्षात तीन प्रभागांमध्ये थोडाफार बदल झाला अन् अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली. पण यातून राष्ट्रवादीला अपेक्षित चित्र बदलेल का? भाजपने काबीज केलेला बालेकिल्ला अजित पवारांना पुन्हा मिळवता येईल का? याची शाश्वती कोणीचं देऊ शकत नाही. म्हणूनचं की अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होऊन चोवीस तास ही उलटले नाहीत, तोपर्यंत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीचा आदेश येऊन धडकला.

खरं तर आयुक्तांची दिल्ली दरबारी जाण्याची इच्छा दाटून आली होती, पण ते त्यांच्या पदरी काय पडलं नाही. आता नाशिक कुंभमेळा आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलीये. त्यामुळं ‘ही बदली म्हणायची की अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यावर त्यांची उचलबांगडी झाली म्हणायची?’ अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे .
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार आता श्रावण हर्डीकर यांच्याकडे सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हर्डीकरांकडे सध्या पुणे मेट्रोच्या महासंचालकाचा पदभार आहे. पिंपरी पालिकेवर नव्या आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत हर्डीकरांकडे इथला अतिरिक्त चार्ज असेल. शेखर सिंह यांनी पिंपरी पालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार ३ वर्षे आणि २ महिने सांभाळला. प्रशासक म्हणून काम पाहताना त्यांनी शहरासाठी राज्य सरकारचे पुरस्कार ही मिळवले. मात्र शहराच्या विकासात खर्ची करण्यात आलेल्या निधीत भ्रष्टाचार झाल्याचे ही अनेक आरोप शेखर सिंह यांच्यावर होते. आगामी महापालिका निवडणुकीत या भ्रष्टाचारावरुन शेखर सिंह यांना घेरण्याची व्ह्यूहरचना विरोधकांनी आखली होती. मात्र तत्पूर्वीच त्यांची बदली झाली. खरं तर श्रावण हर्डीकर यांनी सुद्धा पिंपरी चिंचवड पालिकेच्या आयुक्त पदाचा कारभार पाहिला आहे. शेखर सिंह जितके भाजपच्या बाजूला झुकलेले दिसले तितके नाही पण जाणवेल इतक्या प्रमाणात हर्डीकरांचा कल ही भाजपच्या बाजूने दिसून आला होता. तसा आरोप ही विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी केला आहे.
श्रावण हर्डीकरांकडे तात्पुरता चार्ज आल्याने या आरोपांवर पुन्हा एकदा प्रकाश पडणार हे ही तितकंच उघड आहे. आगामी महापालिकेच्या तोंडावर तात्पुरत्या मिळालेल्या कारभारात हर्डीकरांचा ही कस लागणार आहे. पिंपरी पालिकेच्या निवडणूकीत महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी हे आमने-सामने उभे ठाकणार आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस की पालकमंत्री म्हणून अजित पवारांच्या आदेशाचे पालन करायचं, असा बाका प्रसंग हर्डीकरांवर येऊ शकतो. मात्र अशा प्रसंगांना हाताळण्यात त्यांचा हातखंडा आहे, पण सध्याची वेळ महापालिका निवडणुकीची आहे. त्यामुळं या कचाट्यात अडकू नये, म्हणून हर्डीकर हे तोलून मापून, अगदीच गरज असेल तेंव्हाच निर्णय घेण्याची शक्यता आहे.

























Join Our Whatsapp Group