पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील मिलिटरी डेअरी फॉर्मच्या हद्दीमध्ये नवीन पुलापासून पिंपळे गुरव गावापर्यंत अंतर्गत १०० फुटी अद्यावत रस्ता विकसित करण्यात यावा, अशी मागणी माजी महापौर संजोग वाघेरे (पाटील) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे हे उपस्थित होते.

संजोग वाघेरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी वाघेरे गावातील मिलिटरी डेअरी फॉर्म पुलाचे काम लवकरच पूर्ण होत असून, या पुलामुळे परिसरातील वाहतूक कोंडीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आजूबाजूच्या भागातून मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा वाढणार असल्याने वाहतूक व्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मिलेटरी डेअरी फॉर्मच्या हद्दीमध्ये सदर पुलापासून पिंपळे गुरव गावापर्यंत अंतर्गत १०० फुटी अद्यावत रस्ता विकसित करण्यात यावा.

या मागणीमुळे वाहतूक सुरळीत होऊन स्थानिक नागरिकांना दिलासा मिळेल, तसेच भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता दीर्घकालीन उपाययोजना होण्यास मदत होईल, असे मत वाघेरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच या संदर्भात संबंधित आर्मी अधिकारी व इतर विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते आदेश देण्यात यावेत, अशी मागणी संजोग वाघेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भूमिहीन शेतकऱ्यांना ३७ हेक्टर जमीन परत द्या..
पिंपरी वाघेरे गावातील जमिनी सन १९४२ साली डेअरी फार्मसाठी तत्कालीन कलेक्टर यांनी संपादित केल्या होत्या. त्यावेळी कलेक्टर कार्यालय व मिलिटरी डेअरी फार्म यांच्यात झालेल्या करारानुसार, सदर जमिनीचा वापर संपल्यानंतर मूळ शेतकऱ्यांना जमीन परत देण्यात येईल तसेच शेतीच्या नुकसानीपोटी योग्य ती भरपाई देण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख करारामध्ये करण्यात आला होता. या जमिनी आर्मी जवानांसाठी दूधपुरवठा तसेच गाई-गुरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने घेतल्या गेल्या होत्या. मात्र सध्या मिलिटरी डेअरी फार्मच्या ताब्यात असलेली सुमारे ३७ हेक्टर जमीन वापरात नसून पडून आहे. त्यामुळे पिंपरी गावातील मूळ भूमिपुत्र शेतकरी आजही भूमिहीन अवस्थेत आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित जमिनीची सखोल चौकशी करून वापरात नसलेली जमीन मूळ भूमिहीन शेतकऱ्यांना परत मिळावी, यासाठी शासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. या निर्णयामुळे स्थानिक भूमिपुत्रांवरील अन्याय दूर होऊन पिढ्यानपिढ्या जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी मागणी संजोग वाघेरे यांनी केली आहे.
























Join Our Whatsapp Group