प्रभाग क्र.२२ मधील राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या विजयनिर्धार सभेचे आयोजन पक्षाचा पारंपारिक बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी याठिकाणी संपन्न होणार आहे. काळेवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोष कोकणे, मच्छिंद्र तापकीर, मोनिका नढे आणि उषा काळे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (६ जानेवारी) सायंकाळी ७ वाजता काळेवाडी येथील तापकीर मळा चौक या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेवर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्याचा चंग उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधला आहे. त्याअनुषंगाने त्यांनी शहरावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. विशेषतः पक्षाचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या प्रभागांना अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.

याच धर्तीवर या विजयनिर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. २०१७च्या निवडणुकीत काळेवाडी प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार पैकी तीन उमेदवार विजयी झाले होते. त्यापैकी संतोष कोकणे व उषा काळे यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर व नवा चेहरा असणाऱ्या मोनिका नढे यांना पक्षाने संधी दिली आहे.
या सभेसाठी काळेवाडी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष कोकणे व मच्छिंद्र तापकीर यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group