पीएमटी चौकात शोकसभा : अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतून कार्यकर्ते-नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी परिसरात त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पीएमटी चौकात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

या शोकसभेला नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. सभास्थळी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मौन पाळण्यात आले. यावेळी उपस्थितांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. “दादा म्हणजे केवळ नेता नव्हते, तर सामान्य माणसासाठी लढणारे खंबीर नेतृत्व होते,” अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या.
या शोकसभेत माजी आमदार विलास लांडे, पंडित गवळी, संतोष लांडगे, दत्तोबा लांडगे, सखाराम डोळस, विजय फुगे, वसंत लोंढे, सतीश फुगे, नगरसेवक विराज लांडे, भीमाबाई फुगे, सुरेखा लोंढे, प्रियांका बारसे, सुरज लांडगे, अभिराज गव्हाणे, अमोल डोळस, भानुदास फुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी वक्त्यांनी अजितदादा पवार यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि शहरी विकासासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही राज्याच्या प्रगतीचा पाया असल्याचे सांगण्यात आले. कार्यकर्त्यांशी थेट संवाद, अधिकाऱ्यांवर असलेली पकड आणि निर्णयक्षम नेतृत्व यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय होते, असे मत व्यक्त करण्यात आले.
शोकसभेच्या शेवटी ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी परिसरात शोकाकुल वातावरण झाले होते. उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प केला. अजितदादा पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना शोकसभेतून व्यक्त झाली.






















Join Our Whatsapp Group