पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत सॅनिटरी पॅड, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि वापरलेल्या पॅडच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर मशीनची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिक्षण समिती सदस्य तथा नगरसेवक यश साने यांनी केली आहे.

यासंदर्भात यश साने यांनी माध्यमिक शिक्षण विभाग आणि शिक्षण समितीकडे लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, महापालिका शाळांमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत मोठ्या संख्येने विद्यार्थिनी शिक्षण घेत असून, मासिक पाळीच्या काळात आवश्यक आरोग्यविषयक साधनांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थिनींना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यश साने यांनी शाळांमधील विद्यार्थिनींना दरमहा मोफत सॅनिटरी पॅडचा पुरवठा करावा, स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवावीत. तसेच वापरलेल्या पॅडची सुरक्षित विल्हेवाट लावण्यासाठी इन्सिनरेटर मशीन उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी केली आहे. याशिवाय विद्यार्थिनींमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.

महापालिकेने या सुविधा उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थिनींची शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होईल तसेच त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होऊन त्यांना स्वच्छ व सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळेल, असे यश साने यांनी निवेदनात म्हटले आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.




















Join Our Whatsapp Group