पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीच्या नावाखाली १ हजार कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली मोठे रस्ते छोटे केले. सायकल ट्रॅक केले. रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. अतिशय चुकीची कामे झाली आहेत. या कामांची देखभाल कोण करणार, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. स्मार्ट सिटीचा नियोजन शून्य कारभार असून त्यावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी महापालिका सभेत केली.

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीवर संचालकांची नियुक्ती सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यावर बोलताना शिवसेना गटनेते विश्वजित बारणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2017 मध्ये देशातील 100 शहरात स्मार्ट सिटी योजना सुरू केली. पिंपरी-चिंचवडचाही स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला. त्याला नऊ वर्षे पूर्ण होत आली, तरी स्मार्ट सिटीची विविध कामे संपूर्ण शहरात सुरू आहेत. स्मार्ट सिटी बंद करण्यासाठी शेवटचे काही महिने राहिले आहेत. या माध्यमातून 980 कोटींची गुंतवणूक शहरात करण्यात आली आहे. 490 कोटी केंद्र, 245 कोटी राज्य सरकार आणि 245 कोटी महापालिकेने दिले आहेत.
शहरात 1 हजार कोटी रुपयांची कामे स्मार्ट सिटीच्या नावाखाली झाली आहेत. स्मार्ट पार्किंग, अर्बन डिझायनिंग अंतर्गत रस्ते, वायफाय, सीसीटीव्ही सर्व्हिलेनस्स, कमांड सेंटर अशी विविध कामे झाली आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत बसविलेले एकही सीसीटीव्ही कॅमेरे चालू नाहीत. 8 हजार 790 सीसीटीव्ही कॅमेरे शहरात बसवले आहेत. त्यापैकी 3 हजार 827 कॅमेरे चालू असल्याचे सांगितले जात आहे. पण, प्रत्यक्षात हे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होण्यात अडचण आहे. कमांड सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित नाही.
अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली मोठे रस्ते छोटे केले. सायकल ट्रॅक केले. रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली चुकीची कामे झाली आहेत. या कामांची देखभाल कोण करणार, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. स्मार्ट सिटीच्या एकाही प्रकल्पाचे काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत नाही. नियोजन शून्य कारभार आहे. त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.



















Join Our Whatsapp Group