खंडणी, दरोडा विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील विविध मंदिरातील दानपेटींवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या पोलीसांनी आवळल्या आहेत. या आरोपींकडून चोरलेला ४१ हजार ९३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शहरातील ४ मंदिरात त्यांनी चोरी केल्याचे उघड झाले आहे. विशाल रमेश भालेराव (वय.२७), अजय रमेश भालेराव (वय.२२, दोघेही रा.भोंग्या किराण दुकानाजवळ, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) असे अटक केलेल्या सराईत आरोपींची नावे आहेत. खंडणी, दरोडा विरोधी पथकाच्या गुन्हे विभागाने ही कामगिरी केली आहे.
खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी शहरातील विविध मंदिरात चोरीच्या घटना घडल्या होत्या. गुन्हे शाखेचे पोलीस या घटनेतील आरोपींच्या मागावर होते. दि.१८ मार्च रोजी पोलीस उप निरिक्षक विठ्ठल बढे यांना त्यांच्या खास बातमीदाराकडून बातमी मिळाली की, भोसरीतील गवळी माथा येथील पाण्याच्या टाकीजवळच्या मैदानात दोन जण थांबले आहेत. त्यांनी बऱ्याच मंदीरातील दानपेटी, दानपेटीतील रोख रक्कमेची तसेच वस्तूंच्या चोऱ्या केल्या असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे यांनी पोलीस स्टाफसह तेथे जाऊन आरोपी विशाल रमेश भालेराव आणि अजय रमेश भालेराव यांना शिताफिने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी शहरातील ४ मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरातून चोरून नेलेली दानपेटी, त्यातील रोख रक्कम २० हजार ११० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्याव्यतिरिक्त निगडी येथील मंदिरातील दानपेटीतून ५ हजार २२० रूपये, चिखली येथील मंदिरातून ५ हजार १०५ रूपये, पिंपरीतील मंदिरातून रोख ७ हजार रूपये आणि ४ हजार ५०० रूपये किंमतीचा पितळी नाग, उंदीर असा सर्व गुन्ह्यातील एकूण ४१ हजार ९३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलीसांनी याप्रकरणी मंदिरातील चोरीचे ४ गुन्हे उघड केले आहेत. या गुन्ह्यात अटक केलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरूध्द वाकड, चिंचवड, पिंपरी व भोसरी पोलीस ठाण्यात घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदर कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी/दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उप निरीक्षक विठ्ठल बढे, पुरूषोत्तम चाटे, पोलीस हवालदार अजय भोसले, अशोक दुधावणे, राजेंद्र शिंदे, पोलीस नाईक उमेश पुलगम, किरण काटकर, प्रदिप गोडांबे, सागर शेडगे, सुधीर डोळस, नितीन खेसे, प्रविण माने यांच्या पथकाने केली आहे.
























Join Our Whatsapp Group